बेळगाव लाईव्ह : बेळगाव सीमा लढया संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून बेळगाव वासियांच्या समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे मंत्री आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, युवा नेते अंकुश पाटील, किसन लाळगे शिष्टमंडळात होते.
बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयीन दाव्यालाही गती मिळत नाही. सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटकातून सातत्याने अन्याय करण्यात येतो. पण, त्याबाबत महाराष्ट्राकडून आवाज उठवण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रात आंदोलन करत आहोत.
गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आता सांगली, सातारा, पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असून मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सीमावासीयांसाठी समन्वय मंत्री नेमण्यात यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने मंत्री आबिटकर यांच्याकडे केली.
त्यावर मंत्री आबिटकर यांनी, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयाच लवकरात लवकर पटलावर येण्यासाठी आपण प्रयत्न करू. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. या लढ्याबाबत आपली आस्था आहे. त्यामुळे विशेष लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आम्ही कोल्हापूरकर तुमच्या पाठीशी ठाम आहोत, अशी ग्वाही सर्वपक्षीय कोल्हापूरकरांनी समिती नेत्यांना दिली. आज सकाळी कोल्हापूर सरकारी विश्रामगृहात समिती शिष्टमंडळाने सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. यावेळी मुंबई येथील समितीचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही. डी. पाटील यांच्यासह शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेसचे नेते यांच्याही भेटी घेण्यात आल्या.