बेळगाव लाईव्ह: सांगलीचे खासदार विशाल पाटील बेळगाव प्रश्न संसदेत मांडू तर माजी मंत्री विद्यमान इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई मुक्कामी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून होणाऱ्या मोर्चात स्वतः सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे
सीमाप्रश्न सोडवणुकीकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे न्यायालयीन दाव्याला गती मिळत नाही. तसेच सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटकाकडून सातत्याने अन्याय करण्यात येतो.
याबाबत महाराष्ट्राने आवाज उठवावा, यासाठी समितीच्यावतीने मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सांगली येथे खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली .
त्यावेळी दोन्ही नेत्यांनी स्वतः आपण मोर्चात सहभागी होऊन आंदोलन करू प्रसंगी संसदेत प्रश्न मांडू असे आश्वासन समिती शिष्टमंडळाला दिले.
यावेळी मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष, माजीआमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, ॲड एम. जी. पाटील, युवा आघाडीचे राजू किणयेकर उपस्थित होते.