बेळगाव लाईव्ह :मध्यम व सूक्ष्म (मायक्रो अँड टायनी) उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी खास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्षा राजश्री हलगेकर -नागराजू यांनी दिली.
मराठा मंडळ संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आज मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजकडे असलेल्या 22 एकर जागेमध्ये पाश्चात्य देशात यशस्वी झालेली ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या उपक्रमासाठी 4 एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार असून उपक्रमासाठी कारखानदार किंवा उद्योजकांना निमंत्रित करण्यात येत आहे. आमच्या इंडस्ट्री इन कॅम्पसध्ये सरकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल. याचा फायदा जागा, संरचना, तंत्रज्ञानाच्या सवलती, कार्यालय व अन्य सुविधाचा अभाव असल्यामुळे ज्यांना उद्योग सुरू करण्यात अडचण येत आहे अशा महत्त्वाकांक्षी उद्योजकांना होऊ शकतो.
इंडस्ट्री इन कॅम्पस हा उपक्रम राबवण्याच्या अनुषंगाने येत्या 7 फेब्रुवारी रोजी खास परिषद आयोजित करण्यात आली आहे. नागराजु यादव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या परिषदेस आयटीबीटीच्या सचिव डॉ. एकरूप कौर, एसीई डिझायनर्सचे सीईओ एल. एस. उमेश एसीईएचे सहसंचालक मुरलीधर राव, बीडीएसएसआयएचे श्रीधर उप्पीन, उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, युवा उद्योजक आनंद देसाई आदी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे राजश्री हलगेकर यांनी पुढे सांगितले.
मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या इंडस्ट्री इन कॅम्पस या उपक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या स्टार्टअप्समुळे उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल. या खेरीज उद्योजकता व शैक्षणिक अभ्यास यांच्या देवाण-घेवाण करणे, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रायोजकत्व स्वीकारणे,
विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणे, गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी मदत करणे वगैरे हेतू साध्य होणार आहेत, असे मराठा मंडळ संस्थेचे संचालक डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस अन्य संचालक रामचंद्र मोदगेकर दिनकर ओऊळकर, लक्ष्मणराव सैनुचे आदी उपस्थित होते.