बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज तर्फे आयोजित ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’ हा पहिला शैक्षणिक उद्योग मेळावा नुकताच उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला. या मेळाव्यामध्ये बेळगाव परिसरातील 72 हुन अधिक उद्योजक व 8 महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळाचे विश्वस्त व विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेंगलोर येथील एसीई डिझायनर्स कंपनीचे मुरलीधर राव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे एसीई डिझायनर्सचे एल. एस. उमेश प्रभाकर नागरमुन्नोळी, उद्योजक आनंद देसाई आदी व्यासपीठावर हजर होते. प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले कर्नाटकात पहिल्यांदाच अशा प्रकारे कॉलेज कॅम्पसच्या परिसरात शैक्षणिक उद्योग मेळावा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले. आपल्या उद्घाटनंबर भाषणात विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी इंजीनियरिंग कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील सहयोग वृद्धिंगत झाला पाहिजे असे स्पष्ट केले. तसेच भविष्यातील विचार करता विद्यार्थ्यांना उद्योगाचे ज्ञान होण्यासाठी हा सर्वोत्तम उपक्रम आहे. यामुळे उद्योजकतेलाही प्रोत्साहन मिळेल असे यादव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी बोलताना सरकारकडून उद्योगाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु औद्योगिक वसाहतींसाठी सरकारी जागांची कमतरता आहे एखादे कॉलेज जर उद्योजकांना त्यांचे स्टार्टअप व उद्योग सुरू करण्यासाठी संधी देत असेल तर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेल असे ते म्हणाले. एल. एस. उमेश यांनी मराठा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्या लहान मशीन उत्पादनापासून जगातील सर्वात मोठी सीएनसी उद्योग सुरू करण्याचा प्रवास त्यांनी स्पष्ट केला. कॉलेज कॅम्पसमध्ये औद्योगिक युनिट सुरू करण्यासाठी तसेच ते चालवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
मुरलीधर राव यांनी देखील आपल्या भाषणात सदर उपक्रमाला आपले सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कॉलेज कॅम्पसचे इंडस्ट्रियल स्टार्टअप हब विकसित करण्यासाठी 10 एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध असून या ठिकाणी युवा उद्योजकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. राजश्री नागराज यांनी ‘इंडस्ट्री इन कॅम्पस’ या संपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
याप्रसंगी मराठा मंडळ संस्थेचे सदस्य लक्ष्मणराव सैनूचे, रामचंद्र मोदगेकर, दिनकर ओऊळकर, डॉ. सुरेश मशाळ, शोभा बरवानी, डॉ. चेतन भागोजी, डॉ. स्वाती पाटील, डॉ. रेवण आदींसह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, लघु उद्योजक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर शैक्षणिक उद्योग मेळाव्याचे औचित्य साधून मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज आणि सारूस एरोस्पेस (ड्रोन उत्पादक), मार्स इंजीनियरिंग कॉर्पोरेशन, रिवोट इव्ही मोटर्स (इलेक्ट्रिक वाहनांचे निर्माते), पीटीपी सीएनसी टूलिंग व अरोमा एलिफंट्स कंपनी यांच्यात समन्वय करार करण्यात आला.