बेळगाव लाईव्ह : कोल्हापूर येथे झालेल्या धरणे आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद, सदर आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी घेतलेली सक्रिय भूमिका लक्षात घेत महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज (शनिवार, दि. १५ फेब्रुवारी) झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत घेण्यात आला.
मुंबई येथे महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या दुसरे दिवशी म. ए. समितीच्या वतीने मराठी भाषिकांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या याचिकेबाबत महाराष्ट्र सरकारने योग्य ती पाऊले उचलावीत, सीमाप्रश्नाची सोडवणूक या मुद्द्याव्यतिरिक्त इतर मुद्दे उपस्थित करून सीमाप्रश्नी याचिकेला फाटे फोडू नयेत, लवकरात लवकर सीमाप्रश्नाचा तिढा सोडवून सोक्षमोक्ष लावावा, यासाठी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेसंदर्भात कामकाजाला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागण्यास्तव सदर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनादरम्यान करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनासाठी बेळगावहून रवाना होताना तत्पूर्वी सांगली, सातारा, पुणे आदी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर धरणे आंदोलनासंदर्भात कार्यकर्त्यांनीही महत्वपूर्ण सूचना मांडल्या असून कार्यकर्त्यांच्या सूचना आणि मते लक्षात घेत पुढील रूपरेषा ठरविली जाईल.
बेळगावमध्ये येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यांक आयोगाचे अधिकारी बेळगावात दाखल होणार असून अधिकाऱ्यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी माणसांची व्यथा त्यांच्यासमोर मांडण्याचे ठरविण्यात आले आहे. शिवाय सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणारे अन्याय, अत्याचार, मराठी भाषा संपविण्यासाठी सुरु असलेला खटाटोप यासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक आयोगाने यापूर्वी मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात अद्याप कार्यवाही झाली नाही, याबद्दल देखील कर्नाटक सरकारला जाब विचारण्यात यावा, यासाठी अल्पसंख्यांक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर या अभिनेत्याचाही या बैठकीत निषेध करण्यात आला. याचप्रमाणे बेळगाव मधील वडगाव येथील शेतकऱ्यांच्या बायपास संदर्भातील लढ्याला, आंदोलनाला समितीच्यावतीने पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही ठरविण्यात आले. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या सत्कारासाठी आयोजित तालुका म. ए. समितीच्या रद्द झालेल्या कार्यक्रमासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे आदींसह कार्यकर्त्यांनी देखील आपले विचार आणि मते मांडली. या बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, बी. डी. मोहनगेकर, दीपक पावशे आदींसह समिती नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.