बेळगाव लाईव्ह : गोकाक तालुक्यातील दुपदाळ गावात विजेचे थकीत बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या लाईनमनवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीज जोडणी कापण्यासाठी गेलेल्या लाईनमनला मारहाण करून त्याला अक्षरशः उचलून फेकण्यात आल्याने हेस्कॉम कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोकाक तालुक्यातील दुपदाळ गावातील खादीरसाब पठाणसाब कोतवाल याने तब्बल सात महिन्यांपासून 17,१४६ रुपये इतके वीज बिल थकवले होते. अनेकदा सूचना दिल्यानंतरही बिल न भरल्याने संबंधित लाईनमनने या घराचा वीजपुरवठा खंडित केला होता.
मात्र, तरीही आरोपीने अनधिकृत वीज जोडणी घेतल्याचे आढळून आले. हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाईनमन प्रमोद माळगी व त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा वीज जोडणी कापण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यावेळी आरोपी खादीरसाब पठाणसाब कोतवाल याने प्रमोद माळगी यांना जबर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर त्यांना उचलून जोरात जमिनीवर फेकले.
या घटनेनंतर हेस्कॉम कर्मचारी संतप्त झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
थकीत वीजबिल वसूल करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होत राहिल्यास त्यांचे संरक्षण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, हेस्कॉम प्रशासन या घटनेवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.