बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील इंद्रप्रस्थनगर येथील जक्कीन होंड तलावाची दुर्दशा झाली असून शेवाळे, प्लास्टिक पिशव्या, केरकचरा साचलेल्या या तलावाची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी जागरूक नागरिक व गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील इंद्रप्रस्थनगर येथील जक्कीन होंड तलावामध्ये दरवर्षी सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. सदर तलावाची निर्मिती करण्यात आली त्यावेळी या ठिकाणच्या सौंदर्यात भर पडली होती. त्यामुळे सदर तलावाची नियमित चांगली देखभाल केली जावी अशी स्थानिकांची सातत्याची मागणी आहे.
तथापि दरवेळी या मागणीला महापालिकेकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. वर्षभरात श्री गणेशोत्सव काळातच या तलावाचे भाग्य उजळलेले असते. महापालिकेकडून श्री गणेशोत्सवापूर्वी या तलावाची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते.
मात्र उत्सव समाप्त होताच तलाव देखभालीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे तलावाची दयनीय अवस्था होत असते. पुढील श्री गणेशोत्सवापर्यंत स्थानिकांकडून श्रीमूर्तींचे विसर्जन केल्या जाणाऱ्या या तलावाचे पावित्र्य जपण्याऐवजी दुर्दैवाने त्याचा अक्षरशः कचरा कुंडासारखा वापर केला जातो. आता देखील त्याची प्रचिती येत आहे.
सध्या जक्कीन होंड तलावातील पाण्यावर संपूर्णपणे शेवाळे साचले असून तलावात कचरा भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकलेल्या पहावयास मिळतात. त्याचप्रमाणे तलावांच्या पायऱ्यावरही प्लास्टिक पिशव्या आणि इतर कचरा टाकण्यात आलेला असल्यामुळे सुंदर अशा या तलावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. तलावातील पाण्यात टाकण्यात आलेला कचरा कुजल्यामुळे आसपास दुर्गंधी पसरलेली असते.
तरी स्थानिक नगरसेवकासह महापौर आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चक्कीन होंड तलावाची तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत त्याचप्रमाणे या तलावाची व्यवस्थित देखभाल होईल या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी देखील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन या तलाव परिसरात कचरा फेकू नये. श्रीमूर्तींचे विसर्जन केल्या जाणाऱ्या या तलावाचे पावित्र्य अबाधित ठेवावे, असे असे आवाहन जागरूक नागरिक व गणेश भक्तांकडून करण्यात येत आहे.