बेळगाव लाईव्ह : उदरनिर्वाहासाठी गोकाक येथे ऊसतोडणीसाठी दाखल झालेल्या एका दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान पत्नीच्या क्रूर हत्येत झाले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ-महागाव मधील चांबुरदर येथील बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले यांच्यात झालेल्या वादाने अखेर खुनाचे स्वरूप घेतले असून दारूच्या नशेत पतीने पत्नीचा निर्घृण खून करून खुनाचा व्हिडीओ चक्क पत्नीच्या नातेवाईकांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले या जोडप्याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. यवतमाळ येथून उप्परट्टी गावात ऊसतोडणीसाठी सदर जोडप्याने मुक्काम केला होता. दरम्यान सदर जोडप्यामध्ये झालेल्या वादात नशेत असणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.
त्याच्या कृत्याची क्रूरता इतकी घृणास्पद होती कि त्याने या प्रकारचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि चक्क पत्नीच्या कुटुंबीयांना पाठवला. या घटनेचे वृत्त समजताच गोकाकचे डीएसपी, सीपीआय, पी, एस, आय. यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले.
सदर आरोपीची रवानगी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे. या घटनेनंतर सदर महिलेचा मृतदेह त्याचठिकाणी ठेवण्यात आला होता.
झालेल्या घटनेचा अंदाज या जोडप्याच्या चिमुरड्यांना आला नाही. आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असूनही चिमुरड्यांनी आईच्याच मृतदेहाजवळ बसून राहिल्याने बघ्यांचे डोळे मात्र पाणावले.