बेळगाव लाईव्ह : खाऊ कट्टा गाळे प्रकरणी नगरसेवक पद रद्द झालेल्या भाजपच्या दोन नगरसेवकांना कर्नाटक उच्च न्यायालयाने देखील दणका देत याचिका रद्दबातल ठरवली आहे.
बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टयानावर यांनी बजावला होता या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयातील धारवाड खंडपीठात दोन्ही नगरसेवकांनी आव्हान दिले होते त्या याचिकेला उच्च न्यायालयाने रद्द ठरवले असल्याची माहिती वकील नितीन बोलबुंदी यांनी दिली आहे.
प्रादेशिक आयुक्तांनी प्रभाग 23 चे नगरसेवक जयंत जाधव व प्रभाग 41चे नगरसेवक मंगेश पवार यांचे नगरसेवक पद रद्द केले होते या आदेशा विरोधात दोन्ही नगरसेवका कडून उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यासंदर्भात कोणताही निर्णय देण्यापूर्वी तक्रारदार अर्थात याचिकाकर्त्याला कल्पना देऊन सुनावणी घेण्यात यावी, अशी केव्हेट अर्थात चेतावणी याचिका सामाजिक कार्यकर्ते मुळगुंद यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केले होते.
बुधवारी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर वकील नितीन बोलबुंदी यांनी कोर्टासमोर उच्च न्यायालयाने दोन्ही नगरसेवकांच्या पद रद्दच्या आदेशाला स्थगिती देऊ नये आणि त्या दोघांची याचिका रद्द करावी अशी बाजू मांडली त्यावर धारवाड उच्च न्यायालयाने मूळगुंद यांची बाजू ग्राह्य धरत नगरसेवकांची याचिका रद्द केली.
एकूणच भाजपच्या दोन नगरसेवकांचे रद्द झालेले प्रकरण पुन्हा एकदा गाजत आहे. दरम्यान सत्ताधारी गटातील हे दोन नगरसेवक आता पुढे कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.