बेळगाव लाईव्ह : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शनिवारी (दि. १८) होणारी सुनावणी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
यामुळे आता पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार असून, शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप केला आहे.
हलगा-मच्छे बायपासविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत, तसेच न्यायालयातही आपली बाजू मांडत आहेत. मात्र, याच दरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांवर दडपशाही करत बायपासच्या कामास सुरुवात केली आहे.
या प्रकरणी सध्या तिसऱ्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू असून, मागील दोन तारखांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारचे वकील सुनावणीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत.
शेतकऱ्यांनी वारंवार झिरो पॉईंट निश्चित करावा, त्यानंतरच कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीवर जोर देत शेतकऱ्यांचे ज्येष्ठ वकील रवीकुमार गोकाककर यांनी न्यायालयात ठोस भूमिका मांडली होती. परिणामी, न्यायालयाने यापूर्वी स्थगिती आदेश दिले होते. मात्र, कायद्यातील पळवाट काढत बायपासचे काम सुरू करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे काम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत असून, त्यांनी याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, आता खटल्याची सुनावणी ५ मार्चपर्यंत पुढे गेली असून, त्या दिवशीही सरकारी वकील उपस्थित राहणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.