बेळगाव लाईव्ह :गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा आज शनिवारी दुपारी बेळगाव शहरातील खडेबाजार परिसरात खून झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे. ऑटो रिक्षाला कारगाडी चाटून गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून रिक्षा चालकाने केलेल्या हल्ल्यात मामलेदार यांचा मृत्यू झाला असून आरोपी रिक्षाचालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या ऑटो रिक्षा चालकाचे नांव मुजाहिद शकील जमादार वय 28 (रा. सुभाषनगर बेळगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा गोवा येथील 68 वर्षीय माजी आमदार लवू मामलेदार हे काही कामानिमित्त आज शनिवारी बेळगावला आले होते. शहरातील येथील खडेबाजार परिसरातील श्रीनिवास लॉजजवळ दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कारमधून जात होते. त्यावेळी गर्दीत त्यांची कार एका ऑटोरिक्षाला चाटून गेली. त्यावरून रिक्षाचालकाने मामलेदार यांना अडवून वादावादीला सुरुवात केली. या वादावादीचे पर्यवसान रिक्षा चालकाने मामलेदार यांना प्रथम कानशिलात लगावून यांच्यावर हल्ला चढवला. त्या हल्ल्यातून स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात मामलेदार रिसेप्शन काउंटरजवळच खाली कोसळले. लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान लवू मामलेदार यांना तातडीने बेळगावच्या जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, ऑटो रिक्षा चालकाने मारहाण केली त्यावेळी लहू मामलेदार घटनास्थळीच कोसळले होते त्यामुळे मारहाणी नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास देखील व्यक्त केला जात आहे. मारहाणीच्या घटनेनंतर फरारी झालेल्या ऑटोरिक्षा चालक मुजाहिद याला पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गोव्याच्या माजी आमदारावर झालेल्या या घटनेनंतर बेळगावचे पोलीस प्रशासन एकदम जागे झाले होते घटनास्थळी स्वतः डीसीपी रोहन जगदीश यांनी येऊन पाहणी केली तर पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनीही जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन वरिष्ठांना याची माहिती दिली
कोण होते लवू मामलेदार?
मयत लवू ममलेदार हे 2012 ते 2017 या कालावधीत फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. लवू मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, तथापी डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला व जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.