बेळगाव लाईव्ह:तुरमुरी कचरा डेपोमध्ये दोन गॅस निर्मिती प्रकल्प सुरू करून बेळगाव शहर कचरा व्यवस्थापनात एक मोठे पाऊल उचलणार आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) बेळगावात 30 टीपीडी (प्रतिदिन टन) क्षमतेचा प्रकल्प स्थापन केला जाणार असून त्याचवेळी स्मार्ट सिटी-2 योजनेअंतर्गत 100 टीपीडी क्षमतेचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील या प्रकल्पांचे कंत्राटदार अद्याप निश्चित झालेले नसताना गेलच्या प्रतिनिधींनी नुकतीच तुरमुरी कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकल्पासाठी गेल कंपनीकडूनच आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे या प्रकल्पासाठी दररोज 30 टन ओला कचरा उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारी मात्र बेळगाव महापालिकेची असणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटी-2 साठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या 135 कोटी रुपयांच्या निधीपैकी आवश्यक निधी दुसऱ्या प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी दररोज 100 टन ओला कचरा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देखील बेळगाव महापालिकेचीच असणार आहे. हे दोन्ही प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी मिळून दररोज 130 टन ओला कचरा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. ओल्या कचऱ्यापासून औद्योगिक आस्थापनांसाठी आवश्यक गॅस किंवा सीएनजी गॅस तयार केला जाणार आहे.
सध्या बेळगाव शहरात दररोज सुमारे 250-270 टन कचरा निर्माण होतो. तुरमुरी येथे ओल्या कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर होते. तुरमुरी कचरा डेपोची 2006 मध्ये स्थापना झाल्यानंतर प्रारंभी तेथे कचऱ्याचे लँड फीलिंग केले जात होते. मात्र 2007 मध्ये रॅमकी एन्व्हायरो (आता रिस्टेनेबिलिटी) सोबत झालेल्या करारानुसार त्या कंपनीला कंपोस्ट खत तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले. सध्या या कंपनीकडून त्या अनुषंगाने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तथापि आता नवीन गॅस निर्मिती प्रकल्पांसह तुरमुरी येथील कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने बंद केले जाईल. स्मार्ट सिटी-2 उपक्रमामध्ये पाच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा समावेश असून ज्यामध्ये प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात विलंब झाल्यामुळे या प्रकल्पांच्या उभारणीला विलंब होण्याची शक्यता आहे. परंतु गेल कंपनीकडून मात्र येत्या कांही दिवसात प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. भविष्यात या दोन्ही प्रकल्पांसाठी ओला कचरा पुरावा लागणार आहे हे लक्षात घेऊन बेळगाव महापालिकेने कचरा वर्गीकरण सक्तीचे केले आहे.
थोडक्यात शहरातून दररोज ओल्या कचराचे स्वतंत्रपणे संकलन होण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी पुन्हा कचरा वर्गीकरण करावे लागणार नाही, असे महापालिकेचे मत आहे. बेळगाव शहरात ओल्या कचऱ्यापासून वीज बायोगॅस तयार करणारे छोटे छोटे प्रकल्प अधिक सुरू झाले आहेत. याखेरीज कचरा संसाधनांची स्पर्धा टाळण्यासाठी शहराने नवीन लघु प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी केंद्राकडून कर्नाटक राज्यासाठी गेल व एचपीसीएल या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकातील नगर स्थानिक स्वराज्य संस्था या दोन कंपन्यांना विभागून देण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरातून गेलची दाभोळ -बंगलोर ही गॅस वाहिनी गेली आहे. त्यामुळे बेळगावात गॅस उत्पादन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने गेल कंपनीकडे दिली आहे. या धोरणात्मक फायद्यासह गेल कंपनी आता बेळगावच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीला ऊर्जा-उत्पादक उपक्रमात रूपांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली आहे. स्रोत: सकाळ