बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारातील 16 हेक्टर क्षेत्र असलेल्या किल्ला तलावामध्ये मत्स्यपालन करून ठराविक कालावधीनंतर तलावात मासेमारी केली जाते. त्यानुसार कंत्राटदाराकडून आज शनिवारी मासेमारी करून 300 किलो मासे पकडण्यात आले. त्यामध्ये तब्बल 8.5 किलो वजनाचा मासा आढळून आला हे विशेष होय.
किल्ला तलावामध्ये गेल्या पावसाळ्यादरम्यान जुलै महिन्यात 80 हजार ते 1 लाख मत्स्यबीज (माशांची पिले) सोडण्यात आली होती. मात्र पूर्ण वाढ झालेले हे मासे या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मरून पडू लागले होत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराकडून आज शनिवारी सकाळी या तलावात मासेमारी करण्यात आली. त्यावेळी मत्स्यबीजे सोडलेले पूर्ण वाढ झालेले 300 किलो मासे जाळ्यात सापडले. त्यामधील 8.5 किलोचा मासा लक्षवेधी होता.
आजच्या मासेमारीप्रसंगी सर्वसामान्य माशांसह घरातील एक्वेरियममध्ये पाळले जाणारे रंगबिरंगी शोभेचे मासे देखील बऱ्याच प्रमाणात सापडले. घरातील एक्वेरियममध्ये मिळणारे मर्यादित खाणे आणि अपुरी जागा यामुळे वाढ खुंटलेले हे मासे विस्तृत किल्ला तलावात मुबलक खाद्य मिळाल्यामुळे चांगले मोठ्या आकाराचे झाले होते. दोन ट्रे भरून मिळालेले हे रंगीबेरंगी मासे कुतूहलाचा विषय झाले होते. लोकांनी किंवा मुलांनी टाकल्यामुळे हे मासे तलावात आले असावेत.
सरकारच्या मत्स्य खात्याकडून मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध जलाशये आणि तलाव भाडेतत्त्वावर घेतले जात आहेत.
या जलाशय आणि तलावांमध्ये पावसाळ्यात माशांची पिले सोडली जातात. त्यानंतर त्यांची पूर्ण वाढ झाल्याबरोबर ते बाहेर काढले जातात. बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन 4,651 टनाने वाढले आहे. गत वर्षभरात बेळगाव जिल्ह्यात 7,890 टन मत्स्य उत्पादन घेण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेततळे, मत्स्य तळे मंजूर करून देण्यासह ग्रामीण भागातील तलाव, नदी, कालवे यामध्ये मत्स्य उत्पादन घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन दुप्पट वाढले आहे.