बेळगाव लाईव्ह : २०२५ या नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच बेळगाव शहर – परिसर आणि तालुक्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढला आहे. हाणामारी, खून, चोरी, घरफोडी, चाकू हल्ले, मटका, जुगारी अड्डे, स्पा आणि पार्लरच्या नावाखाली चाललेले बेकायदेशीर उद्योग प्रकाशझोतात येत असून समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एखाद्या शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल, तर तेथील पोलीस यंत्रणा सक्षम असणे अत्यावश्यक आहे. पोलीस व्यवस्थाच निष्काळजी ठरल्यास, जनमानसातील पोलिसांविषयीची भीती आणि आदर दोन्ही कमी होऊ लागतात. परिणामी, सराईत गुन्हेगार अधिक धीट होतात, तर काही उत्साही आणि आक्रमक प्रवृत्तीचे तरुणही गुन्हे करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शनिवारी बेळगावमध्ये याचेच प्रत्यंतर आले.
गोव्याचे माजी आमदार लावू मामलेदार यांच्यावर क्षुल्लक कारणावरून झालेला वाद, वादाचे पर्यावसान हाणामारीत आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू या घटनेमुळे बेळगाव शहराची प्रतिमा मालिन होत चालली आहे. बेळगावमधून गोव्याला दूध व भाजी पुरवठा होतो. गोव्यातील हॉटेल व पर्यटन व्यवसायात बेळगावचे असंख्य तरुण काम करत आहेत. त्यामुळे गोवा व बेळगाव यांचे संबंध अधिकाधिक दृढ होण्याची गरज असताना मारहाणीमुळे गोव्याच्या एका माजी आमदारांचा बळी जाणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
चोऱ्या, घरफोड्या, खून, चाकू हल्ले, अमली पदार्थांची विक्री व सेवन अशा अनेक घटनांमुळे बेळगावकरांची देखील चिंता वाढत चालली आहे. शिवाय अशा वाढत चाललेल्या घटनांमुळे परगावाहून बेळगावमध्ये येणारे नागरिक देखील धास्तावले आहेत. बेळगावमध्ये मोठी बाजारपेठ असल्याने चंदगड, कोकण, गोवा यासह विविध ठिकाणचे लोक बेळगावमध्ये येतात. बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बेळगाव हे अत्यंत शांत आणि आतिथ्यशील गाव असे वाटण्याऐवजी आता बेळगाव नको, असे म्हणण्याची वेळ येत असेल तर ती बेळगावकरांसाठी एक शोकांतिका आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे व्यापार आणि उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय गुन्हेगारांकडून मिळत असलेल्या वरकमाईमुळे काही अधिकाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बेळगावच्या शांततेला आणि प्रतिमेला सुरुंग लावत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे.
गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारीच्या घटना पाहता गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालल्याचे निदर्शनात येत आहे. ऊस तोडणी कामगाराने क्षुल्लक कारणावरून केलेली पत्नीची हत्या, सख्ख्या भावांमध्ये झालेला वाद आणि यातून झालेली हत्या, जावयाने सासूचा खून केल्याची घटना, पत्नीकडून पतीचा खून, यासह मायक्रो फायनान्स च्या नावाखाली अनेकांची झालेली कोट्यवधींची फसवणूक, चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंग, वाहन चोरी, गोळीबार, अशा अनेक घटनांमुळे बेळगावकर देखील स्वतःला बेळगावमध्ये असुरक्षित समजू लागले आहेत. बेळगाव शांतताप्रिय म्हणून ओळखले जात असतानाच गुन्हेगारी घटनांमध्ये इतके सक्रिय कसे झाले? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
बेळगावमधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता यामागे पोलीस दलाचे अपयश कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय वाढत्या गुन्हेगारीला पोलीस दलाच्या ढिलाईबरोबरच अधिकाऱ्यांमधील गटबाजीही कारणीभूत असल्याचे दिसून येते. बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी याडा मार्टिन मार्बणियांग यांची बदली झाल्यानंतर तरुण आणि तडफदार पोलीस आयुक्त बेळगावला मिळाल्याने बेळगावकर सुखावले होते. मात्र अंतर्गत गटबाजीची कल्पना नव्या पोलीस आयुक्तांना न आल्याने बेळगावात फोफावलेल्या मटका, जुगाराविषयी व या गैरधंद्यांतूनच फोफावत चाललेल्या गुन्हेगारीविषयी त्यांना अंधारात ठेवण्यात आले होते. पोलीस आयुक्तांच्या भोवती एक विषवर्तुळ तयार झाले असून त्यांची दिशाभूल करीत गैरधंदे चालकांना पाठीशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांमुळेच बेळगावात गुन्हेगारी फोफावत चालली आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता जनतेपेक्षा पोलीस दलच हतबल झाले आहे कि काय? असा प्रश्नही नागरीकातून उपस्थित केला जात आहे.