बेळगाव लाईव्ह:वडगाव येथील तलावांचा शेतकरी आपल्या जनावरांसाठी वापर करत असल्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही याकडे लक्ष देत तलावाचा विकास करावा, या वडगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली असून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांनी आज बुधवारी संबंधित तलावांना भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
वडगाव परिसरातील तलावांचा स्थानिक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या प्रकारे लाभ मिळत आहे. या तलावांचा शेतकरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच त्यांना धुण्यासाठी वापर करतात. तेंव्हा या तलावांचा विकास साधताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी अशी मागणी वडगाव भागातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे काल महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली होती.
या मागणीची आयुक्तांनी तात्काळ दखल घेतली असून त्यांच्या आदेशावरून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांनी आज बुधवारी सकाळी मंगाईनगर वडगाव येथील तलावासह अन्य तलावांना भेटी दिल्या. या तलावांची पाहणी करण्याबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी वडगाव भागातील शेतकऱ्यांची बाजू मांडताना सांगितले की, येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक तलावातील पाण्याचा आपल्या गाई, म्हशी वगैरे जनावरांना पिण्यासाठी आणि त्यांना धुण्यासाठी वापर करतात. वडगाव परिसरात पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
या जनावरांसाठी हे तलाव गरजेचे आहेत कारण अलीकडच्या काळात येथील विहिरींचे पाणीदेखील कमी होत आहे एल अँड टी कंपनी मार्फत केला जाणारा पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात नसतो अनेकांच्या विहिरीत सांडपाणी मिसळल्यामुळे त्यांचे पाणी वापरण्या जोगे राहिलेले नाही याखेरीज जवळच्या बळणारी नाल्यातील पाणी देखील दूषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांची जनावरे पाण्यासाठी येथील तलावांवर अवलंबून आहेत. तेंव्हा शेतकरी आणि त्यांच्या जनावरांचे हित लक्षात घेऊन वडगाव येथील तलावांचा विकास साधला जावा अशी विनंती हलगेकर यांनी केली. याप्रसंगी स्थानिक शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.