बेळगाव लाईव्ह: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांची फळे, भाजीपाला वगैरे नाशवंत कृषी उत्पादने दीर्घकाळ ताजी व दर्जेदार राहण्यासाठी बेळगाव विमानतळा शेजारी शीतगृह अर्थात कोल्ड स्टोरेज उभारण्याकरिता कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) स्थापण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या समोर मांडली आहे.
देशातील 18 टक्के फळे आणि पालेभाज्या शीतगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने नष्ट होत असतात. यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ होत आहे. देशातील सुमारे 13.300 कोटी रुपयांची फळे शीतगृहा अभावी नष्ट होतात असा अंदाज आहे.
याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली फळे आणि भाजीपाला सध्याच्या दिवसात दीर्घकाळ ताजा व दर्जेदार राहण्यासाठी शीतगृहे अत्यावश्यक आहेत. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात फळे आणि भाजीपाल्याचे पिक घेतले जाते.
येथील फळे आणि भाजीपाला परदेशातही निर्यात केला जातो आणि याबाबतीत बेळगाव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे लक्षात घेऊन आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच गोवा सरकारने म्हापसा गावाजवळ शीतगृहाची उभारणी केली आहे. तेंव्हा आमच्या राज्यातील बेळगाव विमान तळाशेजारी अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी विनंती खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांना त्यांच्या भेटीप्रसंगी तशा आशयाचे निवेदन सादर करून केली आहे.