बेळगाव लाईव्ह : कर्नाटक आणि महाराष्ट्र या उभय राज्यांमधील बससेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाली. दोन्ही राज्यांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा व्यवस्था यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील बससेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची तसेच पोलीस अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राज्यांतील बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस सेवा महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सुरू राहतील आणि तेथून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवाशांना पुढील अपेक्षित ठिकाणी पोहोचवले जाईल. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही राज्यांतील बससेवेवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये अशा प्रकारच्या घटनांवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले असून, महाराष्ट्र पोलिसांनाही अशा प्रकारच्या घटनांवर कठोर पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे.
बससेवा सुरळीत करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. तसेच, दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक होऊन पुढील आवश्यक निर्णय घेतले जातील.
महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बससेवेला योग्य सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बैठकीला बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.