बेळगाव लाईव्ह : बाळेकुंद्री खुर्द येथे परिवहन बसमध्ये युवतीशी अर्वाच्च वर्तन करणाऱ्या बस कंडक्टर प्रकरणी चौकशीला वेग आला असून, या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.
याबाबत दोन्ही बाजूंकडून मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बणियांग यांनी दिली.
बाळेकुंद्री खुर्द येथे बस प्रवासादरम्यान एका युवतीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून बस कंडक्टरवर कारवाई झाली असली, तरी बस कंडक्टरने याला भाषिक वादाचा रंग दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंनी तक्रारी स्वीकारल्या असून, आता प्रत्यक्षदर्शी प्रवाशांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
बस कंडक्टरने अयोग्य वर्तन केल्याची तक्रार आहे. बस कंडक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सत्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. घटनेच्या वेळी बसमध्ये असलेल्या इतर प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच प्रत्येक खोट्या आरोपांवरही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कर्नाटक परिवहनच्या बस रोखण्याच्या प्रकाराबाबतही विचारणा करण्यात आली असता, सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सीमावर्ती भागातील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.