बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी पर्यटन विभागाने नवीन वेबसाईट सुरू केली आहे. https://belagavitourism.com/ या वेबसाईटमध्ये जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे, स्मारके, पश्चिम घाट, धबधबे, धरणे आणि वन्यजीव सफारी यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पर्यटन विभागाच्या संचालिका सौम्या बापट यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना माहिती दिली.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सौम्या बापट यांनी नवीन वेबसाईटची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवीन वेबसाईटमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, तिथे जाण्यासाठीची वाहतूक सुविधा, तसेच नवीन पर्यटन स्थळांविषयी माहिती असल्यास तीही समाविष्ट केली जाईल.
महाराष्ट्र आणि गोवा सीमावर्ती पर्यटन स्थळांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बापट यांनी सांगितले की, सीमावर्ती काही पर्यटन स्थळांविषयी संक्षिप्त माहिती दिली आहे. तसेच, अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सरकारशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुसळधार पावसात काही धबधब्यांवर निर्बंध लावले जातात, यावर स्पष्टीकरण देताना बापट यांनी सांगितले की, वनखात्याशी चर्चा करून धबधबे पाहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर पर्याय देण्याचा विचार केला जाईल.
सौंदत्ती रेणुकादेवी मंदिरात दर्शनासाठी जोगणभावीपासून रोपवे तयार करण्याच्या योजनेला गती देण्यात आली असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. हा रोपवे सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धतीने उभारण्याचा विचार आहे.
यासोबतच, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी माहिती देणारे मार्गदर्शक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे, असे बापट यांनी सांगितले.