बेळगाव लाईव्ह : महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांना लावलेली स्पेअर व्हील चोरी करणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आरोपींकडून 60,000 रुपये किमतीच्या 5 स्पेअर व्हील्स आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले 9.50 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.
बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील एका ऑटोमोबाईलच्या आवारात उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांची स्पेअर व्हील चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यू.एस. अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी सय्यद अहसन (वय 24, व्यवसाय: चालक, राहणार: शिवमोग्गा) या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीच्या 5 स्पेअर व्हील्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, चोरीसाठी वापरलेले 9.50 लाख रुपये किमतीचे टाटा इंट्रा व्ही30 गोल्ड वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी सोनू सय्यद समिउल्ला (राहणार: शिवमोग्गा) हा सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनियांग, उपपोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक) एन. निरंजन राज अरस आणि मार्केट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पीएसआय एस.आर. मुत्तत्ती, पीएसआय बी.के. मिटगार, एएसआय डी.सी. सागर,
पोलीस कर्मचारी बसवराज नरगुंद, खाजरसाब खानम्मनवर, नागप्पा, बीरगोंड, गोविंदप्पा पूजारी आणि तांत्रिक विभागातील रमेश अक्की व महादेव खशिद यांचा समावेश होता. या पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आणि उपपोलीस आयुक्त यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.