बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2240 मेट्रिक टन क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजच्या उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात आरआयडीएफ-30 योजनेअंतर्गत हे कोल्ड स्टोरेज उभारले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी व फलोत्पादन मालाच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे दरवर्षी सुमारे 25 ते 30 टक्के उत्पादन वाया जात होते.
यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. शिवाय, ताज्या उत्पादनांसाठी बाजारात जादा दर मोजावे लागत होते.
ही समस्या दूर करण्यासाठी बेळगावच्या एपीएमसीमध्ये मोठ्या क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निविदा जाहीर करण्यात आली असून, 2240 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज लवकरच उभारले जाणार आहे.
यासाठी ९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून एपीएमसीत एकूण 20 ते 30 कोल्ड स्टोरेज उभारली जाणार आहेत. या सोयीमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येणार असून, बाजारभावानुसार योग्य दर मिळवण्यास मदत होईल.