बेळगाव लाईव्ह :बेळगावचा होतकरू जलतरणपटू अनिश अजय पै याने मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 61 व्या संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया खुल्या सागरी जलतरण शर्यत -2025 मधील मुलांच्या गटाचे उपविजेतेपद पटकावले आहे. सदर खडतर शर्यतीत अवघ्या सेकंदाच्या फरकाने अनिश याचा विजेतेपदाचा मान हुकला.
महाराष्ट्र स्टेट अमॅच्युअर एक्वेटिक असोसिएशनतर्फे गेल्या रविवारी 16 फेब्रुवारी रोजी 61 व्या संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया खुल्या सागरी जलतरण शर्यत -2025 चे आयोजन करण्यात आले होते.
यामधील मुलांच्या चौथ्या गटाच्या शर्यतीच्या अंतिम टप्प्यात बेळगावच्या अनिश अजय पै याने संपूर्ण कौशल्यपणाला लावून इतर जलतरणपटूंना मागे टाकत नागपूर येथील रणबीरसिंग गौर याच्याशी अटीतटीची झुंज दिली.
दोघांनीही जवळपास एकाच वेळी शर्यत पूर्ण केली. मात्र त्यामध्ये रणबीरसिंग अवघ्या एक सेकंदाने सरस ठरला. त्याने सदर शर्यत 42 मिनिट 56 सेकंदामध्ये पूर्ण केली, तर अनिश पै याने 42 मिनिट 57 सेकंदामध्ये शर्यतीचे अंतर कापले. या पद्धतीने अवघ्या सेकंदाच्या फरकाने अनिश याचे विजेतेपद हुकले.
जलतरणपटूंसाठी आव्हानात्मक असलेल्या या सागरी जलतरण शर्यतीत महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, ठाणे, सोलापूर, नाशिक त्याचप्रमाणे हैदराबाद, बेळगाव वगैरे विविध ठिकाणच्या जलतरणपटूंचा सहभाग होता. उपरोक्त यशाबद्दल अनिश अजय पै याचे बेळगावच्या जलतरण क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.