बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे गेल्या डिसेंबर 2024 या महिन्यात झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन काळातील निवास व्यवस्थेचे बिल तब्बल 7 कोटी 81 लाख रुपये झाले असून गेल्या 2023 च्या तुलनेत हा खर्च 1 कोटी रुपयांनी वाढला आहे. 2023 मध्ये निवास व्यवस्थेचे बिल 6 कोटी 80 लाख रुपये झाले होते.
गेल्या 9 ते 18 डिसेंबर दरम्यान बेळगावमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी, व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या निवास व्यवस्थेसाठी शहर परिसरातील 85 हॉटेल्स मधील तब्बल 2,200 खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.
या निवास व्यवस्थेच्या बिलाची माहिती बेळगाव महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि तेथून राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. यंदा निवास व्यवस्थेसाठी आणखी कांही हॉटेल्स मधील खोल्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्यामुळे बिल 7 कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती महापालिकेतून मिळाली आहे.
दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन काळात निवास व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेकडे दिली जाते. अधिवेशनाची तारीख निश्चित होताच महापालिकेकडूनच हॉटेल मालकांची बैठक घेऊन खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना दिली जाते. अधिवेशन काळात ज्या खोल्या आरक्षित केल्या जातात त्यांना सवलतीच्या दरात भाडे आकारणी केली जाते.
तथापि यावेळी नियमित ग्राहकांसाठी जो दर आकारला जातो त्यानुसारच भाडे दिले जावे अशी मागणी हॉटेल मालकांनी केली होती.
मात्र यंदा देखील सवलतीच्या दरातच भाडे दिले जाणार असले तरीही बिलाची रक्कम 7 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शासनाकडे पाठवलेले हे निवास व्यवस्थेचे बिल आपल्याला लवकर मिळावे, अशी हॉटेल मालकांची अपेक्षा आहे.