बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे आयोजित सैन्यात निवड झालेल्या बेळगाव तालुक्यातील युवक -युवतींचा सत्कार समारंभ आज बुधवारी दुपारी मोठ्या दिमाखात पार पडला.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर सभागृहामध्ये तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सीमालढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केल्यानंतर लष्कर, नौदल, हवाई दल, रेल्वे, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ वगैरेमध्ये निवड झालेल्या युवक -युवतींचा सत्कार माजी आमदार किणेकर व युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये रोशनी वसंत मुळीक (कंग्राळी बुद्रुक), करुणा गेणूचे (मंडोळी), दीपा पाटील (सावगाव), तुषार पाटील (कंग्राळी खुर्द), आशीतोष बिळगोजी (हालगा), ओमकार पाटील (बस्तवाड), तुषार मल्लाप्पा पाटील (कंग्राळी बुद्रुक), प्रतीक पाटील (कंग्राळी बुद्रुक), समर्थ दत्ता आजरेकर (विनायक नगर बेळगाव), संतोष भरत पाटील (मंडोळी), मनीषा बुरुड (समर्थनगर बेळगाव), श्रेयस तारीहाळकर (कर्ले), वैभव जागृत (किणये), सुशांत नावगेकर (बोकनुर), भूषण बाचीकर (बेळगुंदी), ज्योतिबा पाटील (खादरवाडी) मंथन बिर्जे (हंदीगनूर), वैष्णवी पाटील (सोनोली), धनश्री कडोलकर (कंग्राळी बुद्रुक), भावेश्वरी कृष्णा गोंडाडकर (जाफरवाडी), भावना कृष्णा गोंडाडकर (जाफरवाडी), प्रसाद कडकोळ (कंग्राळी खुर्द), लखन चौगुले (बस्तवाड), प्रवीण विठ्ठल वडसुर (हिंडलगा), आशिष नजीर पपा (कंग्राळी बुद्रुक) आणि गणेश रमेश बिळगोजी (हालगा) या युवक -युवतींचा समावेश होता.
समारंभाप्रसंगी बेळगाव तालुका म. ए. समिती, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह हितचिंतक तसेच समिती कार्यकर्ते व मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना प्रमुख पाहुणे माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची युवा आघाडी पुनर्रचना करण्यात आल्यानंतर सक्रिय झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीच्या बाबतीत मराठा समाजामध्ये अधिकाधिक आत्मियता निर्माण व्हावी. युवा पिढीला बेळगाव तालुका म. ए. समितीचा उद्देश समजावा. तसेच त्यांनी जिद्दीने व परिश्रमाने सैन्य दलात स्थान मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित करणे असा दुहेरी हेतूने ठेवून आज भारतीय सैन्य दिवसाचे औचित्य साधून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील युवक -युवती अतिशय सक्षम असतात. मात्र त्यांना संधी उपलब्ध होत नाही. ती संधी या तरुण-तरुणींनी सैन्य दलात भरती होऊन प्राप्त केली आहे त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. सीमा भागातील मराठी भाषिकांवर गेली 69 वर्षे जो अन्याय होत आहे. खरंतर बेळगाव तालुक्यातील युवक युवती कर्नाटक पोलीस, तलाठी, ग्रामपंचायत सचिव, ग्राम विकास अधिकारी वगैरे सर्व पदांसाठी पात्र आहेत. मात्र फक्त कन्नड भाषा येत नसल्यामुळे त्यांना या नोकऱ्या मिळत नाहीत.
यासाठीच त्यांनी देशपातळीवर सैन्य दलातील नोकऱ्या प्राप्त केल्या आहेत. सीमाभागावरील अन्याय दूर झाला तर आमच्या युवा पिढीला नोकऱ्या मिळून बेरोजगारी दूर होईल, या दृष्टीने महाराष्ट्र एकीकरण समिती कायम प्रयत्नशील असते. हा उद्देश युवा पिढीला कळवा म्हणून आम्ही पहिल्यांदाच आजचा हा सत्कार समारंभाचा उपक्रम राबविला असून आमचा हा उद्देश साध्य होईल अशी मला आशा आहे, असे माजी आमदार किणेकर म्हणाले.