बेळगाव लाईव्ह :होसुर, पिंपळकट्टा नजीक पी. बी. रोड येथे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हाॅल्वला गळती लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया असून एल अँड टी याकडे तात्काळ लक्ष देऊन गळती थांबवण्याची मागणी केली जात आहे.
जलवाहिनीच्या व्हाॅल्वला लागलेल्या गळतीमुळे पी. बी. रोड रस्त्याच्या एका बाजूला सध्या पाणीच पाणी वाहत आहे. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर यापूर्वी तीन वेळा एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर पाणी गळतीची दुरुस्ती केली होती.
मात्र तरी देखील या ठिकाणी अद्याप पाण्याचा अपव्यय सुरूच असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी नेमकी कशाची दुरुस्ती केली? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आगामी उन्हाळा लक्षात घेऊन पाण्याचे संवर्धन करण्याची गरज असताना या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने स्थानिक दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तरी एल अँड टी या कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन होसुर, पिंपळकट्टा नजीक पी. बी. रोड येथे जलवाहिनीला लागलेली गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत. तसेच ती दुरुस्ती शाश्वत असेल याची काळजी घ्यावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.