बेळगाव लाईव्ह : राज्यात काँग्रेस सरकारची सत्ता असली तरी बेळगावमधल्या राजकारणात नेहमीच वेगळ्या दिशेने वारे वाहतात. बेळगावमधील उत्तर, ग्रामीण, दक्षिण या मतदार संघाचे राजकारण नेहमीच पक्षापेक्षाही व्यक्तिगत पातळीवर अधिक चर्चेत येते, हे आजवर पाहायला मिळाले आहे. सध्या बेळगावच्या राजकारणात वेगळ्याच विषयावरील चर्चा पाहायला मिळत असून दक्षिण विधानसभा मतदार संघात प्रामुख्याने दोन महत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चांना ऊत आला. केवळ चर्चाच नाही तर येथील दोन मुद्द्यांवरून राजकारण आणि वातावरण दोन्हीही तापले आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी कोंडीत पकडण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले. अखेर सी. टी. रवी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वादानंतर अधिवेशनाचे सूप वाजले. अधिवेशन संपताच बेळगावमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या शताब्दी समारंभाची तयारी सुरु झाली आणि यादरम्यानही शहरात लावण्यात आलेल्या स्वागत कमानी, बॅनर्स, होर्डिंग्स वर छापण्यात आलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले. अधिवेशनाची चर्चा आणि तयारी बाजूला सारत काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार हमरीतुमरी पाहायला मिळाली.
याचदरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंह यांचे निधन झाले आणि यानंतर देशभरात सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचीही सांगता झाली.
राजकारण्यांचा ताफा परतीच्या वाटेवर असतानाच बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघात मात्र आनंदनगर-वडगाव येथील नाला आणि अनगोळ येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले. दोन्ही ठिकाणी मुद्दे वेगवेगळे असले तरी स्थानिकांना डावलून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून नागरिकांनी संताप व्यक्त करत कामकाजच ठप्प केले.
आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्यावर अतिक्रमण केलेल्या घरांवर मनपाकडून बुलडोजर कारवाई केली. मात्र स्थानिकांना विश्वासात न घेता हे कामकाज करण्यात आल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी मनपाविरोधात बंड पुकारले. येथील रहिवाशांची उद्या महानगरपालिकेत बैठक होणार असून यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनगोळ येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आणि मूर्ती उद्घाटन आणि अनावरण सोहळ्याचे आयोजन मनपाने केले आहे. येत्या ५ जानेवारी रोजी मूर्ती अनावरण सोहळा आयोजिण्यात आला असतानाच आज अचानकपणे घिसाडघाईने वास्तुशांती कार्यक्रम आटोपण्याचे मनपाने ठरविले.
मात्र यावेळीही स्थानिक नागरिक, शिव-शंभू प्रेमींना विश्वासात न घेता इतक्या घाईगडबडीने कार्यक्रम आयोजिण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित करत ४० गल्लीतील पंच कमिटीमधील महत्वाच्या व्यक्तींनी एकत्रित येऊन महासभा घेतली. मूर्ती स्थापना, स्मारक उद्घाटन, मूर्ती अनावरण या गोष्टी थाटामाटात करणे गरजेचे असताना मनपाने इतक्या घाईगडबडीत कोणत्या कारणास्तव निर्णय घेतला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
दोन्ही घटनांची तीव्रता आणि नागरिकांचा रोष इतका उफाळून आला कि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलीस यंत्रणेचे सहकार्य घ्यावे लागले आहे. सध्या दोन्ही परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दक्षिणेतील उफाळून आलेल्या दोन्ही मुद्द्यांमुळे सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. आधी हिवाळी अधिवेशन, काँग्रेसचे अधिवेशन नवीन वर्षाचे स्वागत आणि शुक्रवारी होणारा राष्ट्रपतींचा दौरा या सगळ्या नंतर तापलेले हे दोन मुद्दे त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे.
दक्षिणेतला या दोन्ही मुद्द्यावर सर्वसामान्य नागरिक, राजकीय व्यक्ती यासह सर्वच स्तरावर चर्चा उपचर्चांना ऊत आला आहे. अंतर्गत राजकीय खेळी देखील सुरु असल्याचे जाणवत असून याचा ताण मात्र मनपासह आता पोलीस यंत्रणेवर देखील आला आहे, हे नक्की.