Saturday, February 1, 2025

/

शहरात काँग्रेस मेळाव्याची जय्यत तयारी, महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील सीपीएड मैदानावर उद्या, मंगळवार, 21 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ या घोषवाक्याखाली भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वागत कमानी उभारून आणि रस्त्यांवर रोषणाई करून बेळगाव सजवण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 साली बेळगाव येथे झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने काँग्रेसने ‘गांधी भारत’ मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत महात्मा गांधी यांच्या विचारांचे देशव्यापी प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून उद्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता हालगा येथील सुवर्ण विधानसौध आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरणाने होणार आहे. या अनावरण समारंभाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभेचे सभापती यू. टी. खादर, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 belgaum

अनावरणानंतर दुपारी सीपीएड मैदानावर काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांसह विविध राज्यांतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या वेळी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व संविधान रक्षण मोहिमेवर चर्चा केली जाणार आहे.

सदर कार्यक्रम यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे तो रद्द करण्यात आला होता. आता नव्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.Gandhi

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे.

कार्यक्रम स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या सर्व शाळांना सुट्टी

बेळगाव लाईव्ह : उद्या शहरात काँग्रेसचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.