बेळगाव लाईव्ह :कॉम्रेड कृष्णा मेणसे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले आपल्या आयुष्यातील तब्बल आठ दशकांचा काळ समाजातील वंचित घटकासाठी खर्ची घातला. वयाच्या ९७ व्या वर्षापर्यंत म्हणजेच अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे समाजकारण, राजकरण कष्टकऱ्यांच्या भाकरीभोवतीच फिरत राहिले.
समाजातील कष्टकरी, सामान्य माणूस, कामगार, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार अशा घटकासाठीच त्यांचा प्रत्येक श्वास पडला. अशा वंचित घटकासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक आंदोलने केली. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या. तुरूंग हे त्यांचे दुसरे निवासस्थान होते. किती आंदोलने आणि रस्त्यावरच्या लढय्या त्यांनी केल्या याचा हिशेब मांडता येणार नाही. देशातील सहा मोठया कारागृहात त्यांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ गेला.
देशाचा स्वातंत्र लढा हैद्राबाद मुक्ती संग्राम, सीमालढा, महागाई, बेकारी, महिलांचे प्रश्न याविरूद्धची आंदोलने यामध्ये ते आघाडीवर राहिले. विद्यार्थीदशेपासूनच लालमाती, तालिम, कुस्ती अशा वर्तुळात राहिल्याने त्यांची शरिर प्रकृती दणकट राहिली. त्यांचा लाभ त्यांना आंदोलनाच्यावेळी पोलिसांचा प्रचंड मार सहन करण्यासाठी झाला. बेळगावला एका आंदोलनात लुईस नावाच्या एका पोलिसाने त्यांना इतकी बेदम मारहाण केली की त्यांच्या जागी दुसरा कोणीही टिकाव धरू शकला नसता. हे सारे कशासाठी तर समाजातील कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या भल्यासाठी. कम्युनिस्ट पक्षाचा लालबावटा १९५० च्या दशकात खांदयावर घेतला तो अखेरच्या श्वासापर्यंत कायम होता. विचारांची पक्की बैठक घेऊनच ते समाजाकारण आणि राजकारणात उतरले होते.निवडणूक सत्तेचे राजकारण यापेक्षा रस्त्यावरच्या लढय्या करून न्याय मिळवण्याचा मार्ग चोखाळला. सतत चळवळी आणि जनसंपर्क हे त्यांच्या जगण्याचे बळ होते. दिर्घायुष्याची गुरूकिल्ली असेच त्याला म्हणता येईल.
स्वातंत्र लढयात त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला. आचार्य विनोबा भावे यांच्या समवेत राहण्याची संधी मिळाली. या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्या सहवासातूनही त्याना जगण्याची ऊर्जा आणि काम करण्यासाठी योग्य दिशा मिळाली. विद्यार्थी दशेत अभ्यासाबरोबरच चांगले शरिर कमावले. त्यासाठी कुस्तीला त्यांनी जवळ केले. आंतरविद्यापीठ स्पर्धेत कुस्तीमध्ये त्यांना प्रथम कमाकासह त्यांना सुवर्ण पदक मिळाले.
केवळ २९ सेकंदात त्यानी ही कुस्ती जिंकली होती. बेळगाव परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी अनेक लढाया केल्या. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढयात ते आघाडीवर होते. कांतीसिंह नाना पाटील भूमीगत असताना त्यांच्याकडे राहत होते. पोलिसांची करडी नजर मेणसे यांच्यावर असल्याने त्यांनी मोठया हुशारीने नाना पाटील यांची व्यवस्था आपल्या मित्राच्या घरी केली. त्यांची कृतज्ञता म्हणून मेणसे गल्लीतील चौकाला कांतीसिंह नाना पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. कॉम्रेड मेणसे यांची स्मरणशक्ती, निरिक्षणशक्ती आणि इच्छाशक्ती जबरदस्त होती. यांची प्रचिती त्यांच्यांशी संवाद साधताना अनेकांनी अनुभवली आहे. एक लढवय्याचा जीवनपट मांडण्याची संधी मला मिळाली.
त्यांच्या जीवनावर आधारीत कॉम्रेड या नावाने एक पुस्तक प्रकाशित झाले. याच बरोबर त्यांची पॉडकॉस्ट मुलाखत घेण्याची संधीही मिळाली. त्यामुळे एका लढवय्याचा जीवनपट वाचकासमोर खास करून युवापिढीसमोर येऊ शकला. त्यांच्या निवासस्थानी, त्यांच्या संग्रहात अनेक वस्तू आहेत. फोटोंचा संग्रह खासकरून कुस्तीची लढत असलेला फोटो ते सर्वाना अत्यंत आत्मियतेने दाखवत असत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि आनंद पाहायला मिळत असे. आपले वय विसरून ते आपल्या कुस्तीच्या काळातील अनुभव सांगत असत जणू कुस्तीचे मैदान मारून हातात सुवर्णपदक आहे.
अशा थाटात ते माहिती देत असत. त्यांचा ग्रंथ संग्रहही खुप वेगळा त्यातील काही ग्रंथ विद्यापीठात अभ्यासक्रमात आहेत. गोवा शासनाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकातही त्यांचे छायाचित्र आहे. या साऱ्याचा त्यांना मोठा अभिमान वाटायचा. ही गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावरील विविध भावातून स्पष्ट दिसायची. हैद्राबाद मुक्ती लढयातील घटनेच्या नोंदी पुस्तकात आहेत. प्रत्येक घटनाक्रम अत्यंत मुद्देसुद सांगण्याची कला त्यांना लाभली होती. यातून ते आपला सार्वजनिक जीवनपट हळूवारपणे उलघडत असत. हा सारा प्रवास कॉम्रेड या पुस्तकात पाहायला मिळतो.
कृष्णा मेणसे ही व्यक्ती नव्हती ती एक चालती-बोलती संस्था होती. तो एक अर्ध शतकाच्या चळवळीचा इतिहास होता. बेळगाव पासून थेट दिल्लीपर्यत विविध चळवळीच्या माध्यमातून त्यांचे नाव दूरवर पोचले होते. सारा देश त्यांनी डोळसपणे पाहिला होता. जगातील विविध राष्ट्रांना भेटी देण्याची त्यांना संधी मिळाली. रशिया मध्ये सहा महिन्याचा मुक्काम होता. सारा समाज हेच माझे कुटुंब हया भावनेनेच ते आयुष्य जगले. जनतेची काळजी करणारा, श्रमिकांच्या दुःखावर फुंकर घालणारा, जाणता नेता हिच त्यांची आकाराला आलेली प्रतिमा होती. यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. आयुष्यात समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आत्मिक समाधान होते. पश्चाताप करावा अशी एकही गोष्ट आपल्या हातून घडली नाही याचा त्यांना अभिमान होता.
पाच फूटाची उंची, कमावलेले शरिर, तरूणाला लाजवणारा उत्साह, विचाराची पक्की बैठक, बोलण्यातील आत्मविश्वास, सतत हसरा चेहरा यामुळे त्याची छाप समोरच्यावर पडत असे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. परंतू कोणत्याही सन्मानापेक्षा कॉम्रेड कृष्णा मेणसे हीच गोष्ट त्यांना जीवापलीकडे भावली होती. अखेरपर्यंत त्यांनी एक विचार घेऊन ८ दशकाचा प्रवास करताना कष्टकऱ्याच्या भाकरीला केंद्रस्थानी ठेवले होते. अशा या ज्येष्ठ-श्रेष्ठ कर्तृत्व लाभलेल्या कृष्णा मेणसे यांना अखेरचा लाल सलाम…
सुभाष धुमे
ज्येष्ठ पत्रकार