बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील हिंदूनगर, गणेशपुर जवळ गेल्या 10 जानेवारी रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एका त्रिकुटाला अटक केली असून या प्रकरणातील फरारी असलेल्या आणखी तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे भरमा गंगापा पुजेरी (वय 29, रा. हुल्यानुर ता. बेळगाव), मौलाली मक्तुमसाब मकानदार (वय 22, रा. दास्तीकोप्प, ता. कित्तूर) आणि शंकर गोपाळ जालगार (वय 46, रा. कपिलेश्वर मंदिरामागे बेळगाव) अशी आहेत. हिंदू नगर गणेशपुर जवळ गेल्या 10 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील (वय 30, रा. शाहूनगर) याच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता.
एक वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या पूर्व वैमनस्यातून प्रफुल्ल याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे त्याने फिर्यादीत म्हंटले होते. पोलीस तपासात आरोपींनी सुपारी घेऊन हे कृत्य केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणातील आणखी तिघेजण फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अटक केलेल्या त्रिकूटांकडून गुन्ह्यासाठी वापरलेली सेंट्रो कार (क्र. केए 19 एन 9815), एक गावठी बंदूक, जिवंत काडतुसे आणि सुपारी घेतलेल्या पैशातील 35 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात करण्यात केली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि दोन्ही पोलीस उपायुक्तांसह बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर एम. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी, एम. बी. कोटबागी, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, महेश नायक, सन्नाप्पा हंचिनमनी आनंद कोटगी, श्रीमती एम. व्ही. तळवार आदींनी उपरोक्त कारवाई केली. या सर्वांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.