बेळगाव लाईव्ह :दरवाजाची बेल वाजवल्यानंतर महिलेने दार उघडताच तिच्या डोळ्यात चटणी फेकली. यानंतर झटापट करत तिच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारुन ते पळवून नेले. सोमवारी सकाळी ११.३० ते १२ च्या सुमारास उद्यमबागमधील चत्रम्मानगर दुसरा क्रॉस येथे ही घटना घडली. या घटनेत सदर महिलेचे साडेतीन लाखाचे ६२ ग्रॅम दागिने पळवून नेल्याची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मूळचे तामिळनाडूचे व सध्या एल अॅन्ड टी कंपनीत नोकरी करत असल्याने मुरुगन व त्यांची पत्नी प्रियांका हे दांपत्य चन्नम्मानगर दुसरा क्रॉस येथील कम्युनिटी हॉल परिसरात भाडोत्री राहतात. सोमवारी पती कामावर गेल्याने त्यांची पत्नी प्रियांका मुरगन या एकट्याच घरी होत्या. साडेअकराच्या सुमारास चालत आलेल्या
एकाने त्यांच्या घराची बेल वाजविली. कुणीतरी ओळखीचे असेल असे समजून प्रियांका यांनी सहजरित्या दरवाजा उघडला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोराने लगेचच त्यांच्या डोळ्यात चटणीपूड फेकली. त्या डोळे चोळत असतानाच त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारण्यास सुरवात केली. ५६ ग्रॅमचे जाडजूड मंगळसूत्र असल्याने ते तुटत नव्हते. त्यामुळे, दरोडेखोराने झटापट सुरू केली. सदर महिलेला घट्ट पकडून त्याने सोफ्यावर ढकलले. यानंतर त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना संपूर्ण जोर लावत हिसडा मारला.
त्यांच्या गळ्यातील ५६ ग्रॅमचे मंगळसूत्र व १२ ग्रॅमची सोनसाखळी दरोडेखोराच्या हाती लागली. परंतु, सोनसाखळीचे दोन तुकडे झाल्याने सहा ग्रॅमचा तुकडा घरातच पडला तर उर्वरित सहा ग्रॅमचा तुकडा व ५६ ग्रॅमचे मंगळसूत्र घेऊन दरोडेखोराने पलायन केले. चोरीला गेलेल्या दागिन्याची किंमत ३ लाख ५०हजार रुपये नोंदवली आहे.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच., उद्यमबागचे निरीक्षक डी. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करुन दरोडेखोराचा माग काढण्याचा प्रयत्न झाला.
या परिसरात श्वानपथक फिरवण्यात आले. परंतु, काहीही माग निघाला नाही. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने या परिसरात भितीचे वातावरणआहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार उद्यमबाग पोलिसांत नोंद झाली आहे. निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.