बेळगाव लाईव्ह : बेळगाव : महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून सुवर्ण विधान सौधसमोर महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गांधीजींच्या २५ फूट उंच पुतळ्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते चरखा चालवून अनावरण करण्यात आले. गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण होताच कार्यकर्त्यांनी सुवर्णसौधसमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला.
पुतळा अनावरण केल्यानंतर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, बेळगावातील सुवर्णसौधासमोर महात्मा गांधींचा पुतळा उभारून राज्य सरकारने संपूर्ण राज्याचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे. संविधान आणि लोकशाही नसती तर देशात अराजकता माजली असती. गांधीजींनी देश बांधणीची घोषणा पहिल्यांदा बेळगावात दिली. महात्मा गांधीजींबद्दल बोलायचे झाल्यास त्याला खूप वेळ हवा. त्यांनी केलेले कार्य, आपल्याला मिळवून दिलेले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात देशाच्या संविधानाची निर्मिती झाली. त्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आज तुम्हा सर्वांवर आहे. महात्मा गांधीजींनी केलेले कार्य, त्याग, त्यांचे विचारांचा आज सर्वत्र गौरव केला जातो हे आपण पाहतो. मला अभिमान वाटतो की 1924 साली महात्मा गांधी काँग्रेसचे बेळगावमध्ये पहिल्यांदा आणि शेवटचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर त्यांनी कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले नाही. अस्पृश्यता निवारण, देशाची बांधणी आदिंसंदर्भातील घोषणा त्यांनी बेळगाव मधूनच सर्वप्रथम दिल्या होत्या. त्यामुळे आम्हाला बेळगाव खऱ्या अर्थाने संपूर्ण देशासाठी गौरवपूर्ण असे स्थान आहे असे मी अभिमानाने सांगतो. अशा या महान नेत्याच्या पुतळ्याचे अनावरण आज माझ्या हस्ते केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असे सांगून वायनाड केरळ आणि गुलबर्गा येथे देखील महात्मा गांधी यांचे पुतळे स्थापन केले जाणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या वायनाड केरळच्या खासदार प्रियंका गांधी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, विधानसभेचे सभापती यु. टी. खादर, उपसभापती रुद्राप्पा लमाणी, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर, काँग्रेसचे संयोजक सचिव वेणू गोपाल, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, राज्याचे कायदा, न्याय, मानव हक्क, संसदीय कामकाज व पर्यटन खात्याचे मंत्री एच. के. पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व कर्नाटक राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, जयराम रमेश आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी नाडगीत सादर करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकार व गांधी भारत समितीतर्फे मंत्री एच. के. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे सभापती यु. टी. खादर यांनी आपल्या प्रास्ताविकास संस्था विकास महात्मा गांधी पुतळा अनावरणाचा उद्देश स्पष्ट केला.
आजच्या या महात्मा गांधी पुतळा अनावरणाचे औचित्य साधून गदग येथील ग्रामीण विकास आणि पंचायत पंचायत राज्य विद्यापीठाचे नामांतर महात्मा गांधी ग्रामीण विकास आणि पंचायत पंचायत राज्य विद्यापीठ करण्यात आल्याची घोषणा करण्यात येऊन विद्यापीठाच्या फलकाचे खासदार प्रियांका गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवर नेतेमंडळींसह विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. सुरेश नाडगौडर हजर होते.
याखेरीस पुतळा अनावरणाच्या निमित्ताने एका विशेष स्मृती पोस्ट लखोट्यांचे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले गेले. यावेळी प्रारंभी ‘गांधी भारत’ पोस्ट लखोट्याचे, त्यानंतर कर्नाटक सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचे दुसरे केंद्र असलेल्या बेळगावच्या सुवर्ण विधानसौध इमारतीची प्रतिमा असलेल्या पोस्ट लोखोट्याचे अनावरण केले गेले. यावेळी पोस्टमास्टर जनरल कर्नाटक रिजन धारवाड कर्नल सुशीलकुमार हे देखील उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी उत्सवानिमित्त माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याने तयार केलेल्या गांधी भारत स्मरणकेचे प्रकाशन काँग्रेस अध्यक्ष खर्गे, खासदार प्रियंका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर हे देखील हजर होते. कन्नड आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या स्मरणिकेमध्ये बेळगाव येथील अधिवेशनात महात्मा गांधीजींनी केलेले अध्यक्षीय भाषण आणि घेतलेले निर्णय वगैरे गोष्टींचा समावेश आहे. या खेरीज बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी उत्सव आणि निमित्त उदय काल वृत्तपत्राने तयार केलेल्या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले गेले.
अध्यक्षीय भाषणाच्या प्रारंभीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान’ हा काँग्रेसचा मेळावा देखील असल्यामुळे तेथे बोलावे लागणार आहे तेव्हा येथे मी जास्त बोलणार नाही, असे सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व एआयसीसीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आजच्या या सोहळ्याला यावयास हवे होते. मात्र प्रकृती बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत, अशी माहिती देऊन कर्नाटकात बेळगाव मध्ये 1924 साली महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे पहिले आणि शेवटचे अध्यक्षपद स्वीकारले होते हे आपण विसरून चालणार नाही असे त्यांनी सांगितले. बेळगाव मधून महात्मा गांधीजी यांनी निर्णायक स्वातंत्र्य लढ्याची हाक दिली होती. त्यांनी आपल्या भाषणात अहिंसा, सत्य, समानता, ग्रामीण विकास वगैरेंबद्दल आपले विचार व्यक्त केले. यामध्ये महिला सबलीकरणाचा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला होता. आम्ही काँग्रेसजन संविधानाच्या बाजूने थांबणारे आहोत तर भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या विरोधात थांबणारा आहे. त्यासाठी आपण संविधानाचे रक्षण व संवर्धन केले पाहिजे. आपण संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले संरक्षण करेल. अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
ती संधी त्यांना मिळता कामा नये असे सांगून आज या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा उद्देश म्हणजे पुढील पिढीला गांधीजींची तत्वे, त्यांचा आदर्श कळाला पाहिजे आणि त्यांनी तो पुढे नेला पाहिजे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेवटी सांगितले. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अखेर सर्वांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यास कर्नाटकसह इतर राज्यातील आजी-माजी मंत्री, आजी-माजी खासदार आणि आजी-माजी आमदारांसह काँग्रेस कार्यकर्ते आणि पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते.