बेळगाव लाईव्ह:बेळगावशी काँग्रेसचे अनेक दशकांपासूनचे नाते आहे. आता पुन्हा येत्या 21 जानेवारी रोजी ‘जय बापू, जय भीम जय, संविधान’ अधिवेशनाचे (रॅली) बेळगावमध्ये परत एकदा आयोजन केले जात आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि संपूर्ण देशातील काँग्रेस नेतृत्व सहभागी होणार असून या अधिवेशनातून जो आवाज उठेल तो देशाच्या राजकारणाला एक नवीन दशा आणि दिशा देईल, असा विश्वास एआयसीसीचे सरचिटणीस आणि कर्नाटक राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केला.
बेळगाव विमानतळावर आज गुरुवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. सुरजेवाला पुढे म्हणाले की, बेळगाव मध्ये ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अधिवेशनाचे यासाठी आयोजन केले जात आहे की गेल्या 17 डिसेंबर 2024 रोजी संसदेमध्ये देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी फक्त संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला नाही तर त्यांच्या विचारसरणीचे अनुकरण आदर करणाऱ्या लोकांची खिल्ली उडवली आहे.
भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वारंवार संविधानावर आणि संविधानिक हक्कांवर हल्ले करत आहे. ज्या पद्धतीने देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी मोजता येणार नाही इतकी वाढली आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी भाजपकडून संविधानांच्या हक्कांवर बुलडोझर चालवला जात आहे. त्यामुळे आता काळाची गरज आहे. म्हणूनच बापूजी आणि डाॅ. आंबेडकर यांच्या विचारसरणीचे अनुकरण करत भाजपच्या या हुकूमशाही पद्धतीला प्रतिकार करण्यासाठी ‘जय बापू, जय भीम जय, संविधान’ अधिवेशन येत्या 21 जानेवारी रोजी बेळगावमध्ये होणार आहे. त्यानंतर 27 जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या महू येथे या अधिवेशनाचे आयोजन केले जाणार आहे.
एकीकडे हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात आणि दुसरीकडे दलित, वंचित, मागासवर्गीय, गरीब महिला व युवकांचे अधिकार हिरावून घेतात. यासाठी या विरुद्ध महात्मा गांधीजी व डाॅ. आंबेडकर यांचे विचार घेऊन आज देशात क्रांती घडवण्याची गरज आहे. त्यामुळे बेळगावच्या अधिवेशनातून जो आवाज उठेल तो देशाच्या राजकारणाला एक नवीन दशा आणि दिशा देईल.
राष्ट्रपिता महात्मा गांधी 100 वर्षांपूर्वी जेंव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव मधील अधिवेशनाचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले, तेंव्हा या देशाने ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मिळविले. आता 100 वर्षानंतर पुन्हा बेळगाव मधून जो आवाज उठेल तो या देशातील भेदभाव जात-पात, गरीब वंचित शोषितांचे उत्पीडन आणि देशाचा संविधानावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधातील एक मजबूत सूत्र ठरेल असा आम्हाला विश्वास आहे.
या अधिवेशनाच्या तयारीसाठी आज कर्नाटक राज्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देखील बेळगावला येत आहेत असे सांगून बेळगावातील 21 रोजीची अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केला.