बेळगाव लाईव्ह -अविरत साहित्य सेवेची 176 वर्षे कार्यरत असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेली बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमाला यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
18 जानेवारी ते 22 जानेवारी 2025 असे सलग पाच दिवस ही व्याख्यानमाला हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या एसीपीआर सभागृहात रोज सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होत आहे. यंदा या व्याख्यानमालेचे उद्घाटन 18 जानेवारी रोजी वडगावचे इंजिनियर्स व बिल्डर्स श्री अनंतराव नारायण पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे मराठी व कन्नड भाषेतील पत्रकार पुरस्कार व बी ए आणि एम ए परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे पुरस्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहेत.
या व्याख्यानमालेतील वक्ते आणि त्यांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
शनिवार 18 जानेवारी रोजी प्रथमेश इंदुलकर, इचलकरंजी हे “संस्कार महापुरुषांचे” या विषयावर आपले व्याख्यान देणार आहेत.
रविवार 19 जानेवारी रोजी सोलापूरचे ह भ प ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे “संत विचार आणि समकाल “या विषयावर बोलणार आहेत .
सोमवार 20 जानेवारी रोजी बेळगावचे ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित हे “माझा नाट्यप्रवास” या विषयावर बोलणार असून आपला कलाक्षेत्रातील प्रवास सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील.
21 जानेवारी रोजी भुदरगडचे युवराज पाटील हे या धकाधकीच्या “जीवनात कसे तणावमुक्त राहता येईल” याचे मार्गदर्शन करणार आहेत
बुधवारी 22 जानेवारी रोजी मुंबईचे डॉक्टर मिलिंद सरदार हे “आनंदी आणि सदृढ जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सर्वांना ही व्याख्याने खुली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड , उपाध्यक्ष प्रा विनोद गायकवाड, कार्यवाह सुनीता मोहिते, सहकार्यवाह अनंत जांगळे आणि संचालक मंडळाने केले आहे.
व्याख्यानमालेविषयी थोडक्यात –
सीमा भागात एक मानबिंदू ठरलेल्या या सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात 1848 साली नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी जे डी इनविररिटी यांनी केली. त्यानंतर 13 मार्च 1921 पासून या वाचनालयाचे नामकरण “सार्वजनिक वाचनालय” असे करण्यात आले. वाचनालयाची सध्याची इमारत आहे ती 1925 साली बांधण्यात आली. या वाचनालयात नऊ स्वतंत्र विभाग असून 2015 पासून वाचनालयाची शाखा आदर्श सहकारी सोसायटीच्या इमारतीत अनगोळ रोड टिळकवाडी येथे सुरू करण्यात आली आहे.
बॅरिस्टर नाथ पै यांचे सीमा प्रश्नाबाबतचे योगदान लक्षात घेऊन तत्कालीन कार्यकारी मंडळाने 1976 पासून त्यांच्या नावे बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेचे हे 50 वे वर्ष असून आजवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील अनेक थोर विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केलेले आहे.
दुर्गा भागवत, मंगेश पाडगावकर, वसंत बापट ,यशवंत देव, विं दा करंदीकर ,व पु काळे ,ना धो महानोर ,न्या. यशवंतराव चंद्रचूड ,अण्णा हजारे ,अरुण साधू ,मधुकर भावे, प्रकाश आमटे ,जयंतराव पाटील, उज्वल निकम यासारख्या अनेक मान्यवर व्यक्तींनी या व्याख्यानमालेत उपस्थित राहून मार्गदर्शन केलेले आहे. या वाचनालयाच्या वतीने इ.स. 2000 साली 73 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले होते. या वाचनालयाच्या वतीने वर्षभर अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जात असून मराठी भाषा जतन व संवर्धन करण्याचे काम या वाचनालयाच्या वतीने सुरू आहे.