बेळगाव लाईव्ह : तीन वर्षांपूर्वी कन्नड ध्वज फडकवण्याच्या विरोधात कोणेवाडी गावात भगवा ध्वज फडकवल्याने कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी शिवसेना नेते विजय देवणे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल खटल्याच्या समन्सला मान देत ते आज बेळगाव न्यायालयात हजर झाले. खटल्याची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
2021 साली बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनेने लाल-पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय देवणे यांनी 21 जानेवारी 2021 रोजी मराठी भाषिक समुदायाला कन्नड ध्वज काढून टाकण्याचे आवाहन केले होते.
त्याच दिवशी ते कोणेवाडी गावात दाखल होऊन भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे कन्नड व मराठी भाषिकांमध्ये सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांनी या प्रकरणात भादवी कलम 153 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये धर्म, वंश, भाषा व निवासस्थानाच्या आधारे शत्रुत्व निर्माण करणे आणि सद्भावनेला हानी पोहोचवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये कोल्हापूर येथील शिवसेना नेते विजय देवणे, संग्रामसिंग कुपेकर-देसाई, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती आणि संतोष मळवीकर यांचा समावेश आहे.
आज गुरुवारी या खटल्याच्या समन्सला मान देऊन विजय देवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव न्यायालयात हजेरी लावली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे सरचिटणीस व माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, स्थानिक शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर , माजी उपमहापौर रेणू किल्लेकर शुभम शेळके धनंजय पाटील व इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
खटल्याचे पुढील सुनावणीचे कामकाज 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. आरोपींचे वकील ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर हे या प्रकरणाची बाजू मांडत आहेत. या घटनेमुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणि भाषिक तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.