बेळगाव लाईव्ह :माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे काँग्रेसमध्ये सामील झाल्याची अटकळ फेटाळून लावताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कोरे यांच्या घरी नुकतीच दिलेली भेट पूर्णपणे वैयक्तिक होती असे स्पष्ट केले.
“आम्ही प्रभाकर कोरे यांना काँग्रेस पक्षात आमंत्रित केले नाही आणि ते पक्षात सहभागी होणार नाहीत. ही केवळ मैत्रीपूर्ण भेट होती,” असे शिवकुमार यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आपल्या भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कोरे यांच्या सार्वजनिक सेवेतील योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “प्रभाकर कोरे हे आमचे चिरंतन मित्र आणि आदरणीय व्यक्ती आहेत. राजकीय संबंधांची पर्वा न करता त्यांच्या संस्थांनी नेहमीच सरकारला सहकार्य केले आहे.
आगामी गांधी भारत कार्यक्रमासाठी त्यांनी मान्यवरांकरिता त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील 170 हून अधिक खोल्या उदारपणे देऊ केल्या आहेत आणि इतर आवश्यक मदतही दिली आहे.” कोरे यांच्या निवासस्थानी व्यतीत केलेल्या कालावधीबद्दल बोलताना शिवकुमार यांनी पाहुणचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मी ज्वारीच्या भाकरी (जोला रोटी) सह अप्रतिम जेवणाचा आनंद लुटला असे सांगून एक म्हण आहे की जे मका खातात ते कुस्तीपटूसारखे बलवान आणि लवचिक बनतात, असे देखील ते थट्टेने म्हणाले.
कोरे कुटुंबाच्या वारशाची प्रशंसा : उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी कोरे कुटुंबीयांच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचेही कौतुक केले. “प्रभाकर कोरे यांच्या कुटुंबाने देशासाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. ज्यांनी चळवळीला आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला होता,” अशी माहिती त्यांनी दिली. भाजप आणि यत्नाळ यांच्या वक्तव्याला तीव्र प्रतिक्रिया देताना कोरे यांच्या भाजपमधील भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला शिवकुमार यांनी बगल दिली. “जर तुम्हाला वाटत असेल की कोरे यांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी दिली गेली नाही, तर हा भाजपसाठी सवाल आहे,” असे ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरूंचा महात्मा गांधींच्या हत्येशी संबंध जोडणाऱ्या भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ यांच्या वादग्रस्त विधानाला शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच गांधी भारत कार्यक्रमाच्या तयारीचा भाग असलेल्या बेळगावातील कार्यक्रमासाठी गांधी भावंडांच्या आगमनाची उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुष्टी केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या 21 तारखेला सकाळी 10:30 वाजता बेळगाव सुवर्ण सौध येथे ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.