बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून न्यायालयीन लढ्याला चालना देण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने चलो कोल्हापूरचा नारा देण्यात आला होता. यानुसार आज बेळगावमधील विविध ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर समिती नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सीमावासीय कोल्हापूरला रवाना झाले. खासदार शाहू महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र आणि सीमाभागातील नेत्यांची एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी केले. सीमावासीयांच्या न्यायहक्कासाठी आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी एकत्रित काम करणे काळाची गरज आहे.
सीमावासियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी सात दशकांपासून संघर्ष केला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. या लढ्यात हुतात्म्यांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवून पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी योग्य तो सन्मान आणि न्याय मिळवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र असो किंवा सीमाभागातील नेते, सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
४८ खासदारांनी एकत्र येऊन भूमिका घेतल्यास सीमाप्रश्न निश्चित सुटू शकतो. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणासाठी वकीलांशी चर्चा करणे, योग्य ती फी भरणे, आणि इतर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाला २१ वर्षे झाली तरी सीमावासीयांना न्याय मिळालेला नाही. लोकशाहीत सीमाभागातील लोकांवर अन्याय का, असा सवाल खासदारांनी उपस्थित करत लोकशाहीतील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सीमावासियांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री लक्ष देतील आणि हा दावा पुढे नेण्यासाठी नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि सीमावासियांच्या समस्या सोडविण्यात महाराष्ट्र सरकारची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणती भूमिका घेणार, हे पाहणे आवश्यक आहे. सीमाभागातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. आंदोलन योग्य दिशेने पुढे नेऊन सीमावासीयांसाठी न्याय मिळवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या आंदोलनानंतर समिती नेत्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नेते, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या – कार्यकर्ते आणि सीमावासीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.