बेळगाव लाईव्ह : भाजप नेते बि. श्रीरामुलू काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या चर्चा निराधार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव आणि बळ्ळारीतील कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा संघर्ष होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बेंगळुरूमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाजप नेते बि. श्रीरामुलू यांच्याबद्दल बोलताना सांगितले, श्रीरामुलू काँग्रेसमध्ये येतील अशी चर्चा अफवा आहे.
त्यात कोणतेही तथ्य नाही, श्रीरामुलू यांचे कार्यक्षेत्र बळ्ळारी असून आपले कार्यक्षेत्र बेळगाव असल्यामुळे कोणताही संघर्ष होण्याची शक्यता नसल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, श्रीरामुलू यांनी स्वतः काँग्रेसमध्ये येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमांनी या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास थेट संबंधित व्यक्तींनाच विचारावे, असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच त्यांनी काँग्रेसमध्ये कोणालाही निमंत्रण देण्याचा मुद्दाच नाही, असे सांगत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चालू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.