बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी 2028 साली मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या जबाबदारीबद्दल बोलताना त्यांनी पक्षातील एकता आणि हायकमांडच्या निर्णयांचा सन्मान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, डी.के. शिवकुमार यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकत्रित आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षपद बदलाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री जारकीहोळी म्हणाले, अध्यक्षपद बदलाबाबतचा निर्णय हा हायकमांड घेईल. यावर बोलण्याचा अधिकार मला नाही.
भाजप नेते श्रीरामुलू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, याबद्दल विचारल्यावर मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले, आमच्या पक्षाच्या तत्त्वांचा स्वीकार करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. श्रीरामुलू हे माझ्या वैयक्तिक संपर्कात आहेत, परंतु राजकीय स्तरावर नाहीत. ते पक्षात प्रवेश करतील की नाही, हा त्यांचा निर्णय असेल, असा खुलासा त्यांनी केला. तसेच, श्रीरामुलू काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी डी.के. शिवकुमार प्रयत्न करत असल्याच्या प्रश्नावर जारकीहोळी म्हणाले, त्यांनी तसे केल्याचे मला माहिती नाही. मी बंगळुरूला परतल्यावर याबाबत माहिती घेईन, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
२०२८ साली आपण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून पक्षाला सत्तेत आणण्यासाठी आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मी दावेदारी करेन, हे ठाम आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद देणे किंवा न देणे हा हायकमांडचा निर्णय असेल. आम्ही सर्व एकत्रितपणे पक्षाच्या विजयासाठी काम करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री जारकीहोळी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आगामी राजकीय धोरणांबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असून काँग्रेसमधील नेत्यांची भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु आहे, हे यावरून स्पष्ट होते.