बेळगाव लाईव्ह – बेळगावकरांच्या दृष्टीने एक अतिशय भव्य असा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावच्या वतीने आयोजित केला जातो तो म्हणजे अन्नोत्सव. रोटरी क्लबच्या “रोटरी अन्नोत्सव 2025″ हा उत्सव 3 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत होणार आहे व या महाकार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार 3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अंगडी कॉलेज ग्राउंड, सावगाव रोड, बेळगाव येथे होणार आहे. उद्घाटन माजी खासदार आणि सुरेश अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते होईल. डॉ. स्पूर्ती अंगडी आणि रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शरद पै हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील” अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे चेअरमन रो. सुहास चांडक यांनी बोलताना दिली.
अन्नोत्सवाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अन्न ही प्रत्येकाची गरज आहे आणि वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची आवड असते. बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांची खाण्यापिण्याची आवड सुद्धा वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 साली रोटरी क्लब ने सर्वप्रथम “अन्नोत्सव” उपक्रमाची सुरुवात केली. रोटरीचे अविनाश पोतदार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने यशाची ऊंची गाठत अन्नोत्सव ला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले आहे.
या उत्सवात देशाच्या विविध भागातून येणारे दीडशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार असून त्यामध्ये काश्मीर पासून जयपुर पर्यंत, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. यंदाचे अन्नोत्सवाचे 28 वे वर्ष असून या इव्हेंटचे चेअरमन म्हणून रो. शैलेश मांगले व रो. अक्षय कुलकर्णी काम पाहत आहेत.
याहीवर्षी अन्नोत्सवामध्ये 186 स्टॉल्स बरोबरच भव्य अशा स्टेजची उभारणी करण्यात आले आहे. स्टॉल्समध्ये 114 फूड स्टॉल्स, ज्यामध्ये 63 नॉनव्हेज आणि 51व्हेज स्टॉल्स आहेत आणि 72 कंज्यूमर स्टॉल्समध्ये विविध वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. स्टेजवर रोज वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, यामध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धा, बॉलीवूड नाईट, शहंशाह बच्चन नाईट, मिस बेळगावी स्पर्धा, बूगी-वूगी, सुफी नाईट, अलग रिदम, शानदार श्रेया, डिस्को किंग नाईट, बॉलीवूड मिक्सॉलॉजी यांचा समावेश आहे. बारा दिवसात 1.20 लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे.
नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन यावर्षी पार्किंगसाठी भव्य अशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय स्टॉल ओनर साठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी प्रसाधन व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे .
आजवर रोटरी क्लब ने शाळा ,स्वच्छतागृह, ॲम्बुलन्स, नेत्रपेढी, त्वचा पेढी, डायलिसिस केंद्र, पोलिओ व्हॅक्सिनेशन साठी रेफ्रिजरेटर आणि आर्टिफिशियल लिम्बस साठी अर्थसहाय्य केले आहे .यंदाच्या या अन्नोत्सवातून मिळणारा निधी संपूर्णतः बेळगावसाठीच खर्च केला जाणार आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यातून राबवले जाणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुहास चांडक, अन्नोत्सव इव्हेंटचे अध्यक्ष रो. अक्षय कुलकर्णी व रो. शैलेश मांगले, सचिव मनीषा हेरेकर व सर्व रोटेरिअन्स कार्यरत आहेत