बेळगाव लाईव्ह : भाजपमध्ये आतापर्यंतच्या वादात एक नवीन वळण आले असून भाजपचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, रमेश जारकीहोळी यांनी भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना अध्यक्ष पदासाठी अयोग्य ठरवले आहे. विजयेंद्र, अजून लहान असून ते अध्यक्ष पदासाठी योग्य नाहीत अशा शब्दात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांच्यावर टीका केली आहे.
गोकाकमधील अंकलगी येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले, आमच्या पक्षात वाद आहे, पण तो फक्त अध्यक्ष पदाच्या बदलासाठी आहे. जर अध्यक्ष पद बदलले नाही तरी आम्ही पक्ष संघटना करतोच. विजयेंद्र यांच्या माजी मुख्यमंत्री यडियुरप्पा यांच्याबद्दल मौन राखून बोलावे या टीकेला प्रत्युत्तर देताना जारकीहोळी म्हणाले, येडियुरप्पा आमचे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल कधीही अपमानकारक बोलले नाही. पण विजयेंद्र यांनी खोटं बोलणं थांबविणे गरजेचे आहे. मी शिकारिपूरला येणार आहे. त्यावेळी त्यांच्या घरासमोरूनच माझा दौरा सुरू करेन. तारीख ठरवा, मी एकटा येईन. गन मॅन किंवा समर्थक येणार नाहीत. मी एकटा येऊन विजयेंद्र समोरून प्रवास सुरू करेन, त्यावेळी काय होते ते पाहू असे खुले आव्हान देखील त्यांनी दिले.
विजयेंद्र यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यात फिरू देणार नाही, अशी शक्ती माझ्याकडे आहे, असा इशारा देत जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांच्यावर घणाघात केला. विजयेंद्र यांच्यासोबत कमी दर्जाच्या राजकारणात मला सहभागी होणं शक्य नाही. विजयेंद्र यांच्याबद्दल मला कोणताही आदर नाही. अध्यक्ष पदाबद्दल आदर आहे, मात्र त्यांना बदलून नवीन लोकांना संधी देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, तुम्ही पक्षात येऊन तीन वर्षं झाली आहेत. मी तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आलो होतो. तुम्ही त्याच घाणेरड्या पैशात फिरत आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला. यत्नाळ यांच्या समर्थनामुळेच विजयेंद्र पक्षात आले. लिंगायत समाजात अजून अनेक प्रभावशाली नेते आहेत. तुम्ही लहान आहात तुम्ही अध्यक्षपदासाठी योग्य नाही अशी कडवी टीकाही त्यांनी केली. शिवाय आपण केलेल्या वक्तव्यासंदर्भात हायकमांडकडे तुम्ही काही बोलणार असाल तर हायकमांडचा निर्णय मी स्वीकारायला तयार आहे. २०२८ मध्ये सत्ता आणण्यासाठी मी पुन्हा प्रयत्न कारेन, माझी चूक असेल तर मी संपूर्ण मतदार संघातील जनतेची माफी मागायला तयार असल्याचेही रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.