बेळगाव लाईव्ह : काँग्रेस भवन प्रकरणात डि.के. शिवकुमार आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विधानांवर मंत्री सतीश जारकिहोळी यांनी विरोध दर्शवल्यानंतर, माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस भवन निर्मितीतील गोलमाल प्रकरणावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस भवनाच्या बांधकामाशी संबंधित वादाला आता नवा वळण मिळालं आहे. माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी बेळगावातील गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, सतीश जारकिहोळींनी उग्र भूमिका घेतली तरच ते काँग्रेसमध्ये टिकतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेस भवन बांधकामाच्या मुद्द्यावर डि.के. शिवकुमार यांनी चुकीची माहिती दिली आहे. सतीश जारकिहोळी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती भूमिका घेतली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, असं रमेश जारकिहोळी म्हणाले. काँग्रेस भवनासाठी असलेली जागा माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या नावावर होती.
त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन ही जागा काँग्रेस भवनासाठी मिळवण्यात आली. नंतरच्या काळात, काँग्रेस भवनासाठी ५४ लाख रुपये एका टप्प्यात द्यावे लागले. मी स्वतः १ कोटी २७ लाख रुपये देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली, असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या भूमिकेबाबत बोलताना, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या प्रकरणात किती योगदान दिलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांनी दिलेल्या निधीबाबत खुलासा होणं गरजेचं आहे, असं रमेश जारकिहोळी म्हणाले.
डि.के. शिवकुमार यांच्या विधानांचा निषेध करत, काँग्रेस भवन निर्मितीविषयी त्यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यांनी दिलेली माहिती राज्याच्या जनतेला दिशाभूल करणारी आहे, असं मत रमेश जारकिहोळी यांनी व्यक्त केलं. सतीश जारकिहोळी यांना आता उग्र भूमिका घेण्याची गरज आहे.
विरोध करण्याची योग्य वेळ आहे. त्यांचं नेतृत्व काँग्रेस पक्षासाठी आवश्यक आहे, असं सांगत रमेश जारकिहोळी यांनी सतीश जारकिहोळी यांना पाठिंबा व्यक्त केला. काँग्रेस भवनाच्या बांधकामाशी संबंधित निधी आणि खर्चावरील या वादामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळे आगामी राजकीय स्थितीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.