Saturday, February 8, 2025

/

प्रा. परशराम भरमाण्णा कुंभार : एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व

 belgaum

कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याचा जबरदस्त आत्मविश्वास, जिद्द, अपयश पचवण्याची ताकद आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जीवनातील आपले ध्येय साध्य करण्याच्या बाबतीत आपल्याला कोणीच रोखू शकत नाही, हे एकेकाळचे गवंडी आणि सध्या मराठीचे प्राध्यापक असलेल्या बसुर्ते (ता. जि. बेळगाव) गावच्या ध्येयवेड्या प्रा. परशराम भरमाण्णा कुंभार यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या आपल्या मुलाने उत्तम शिक्षण घेऊन नावलौकिक मिळवावा अशी परशराम यांची आई यशोदा यांची तीव्र इच्छा होती. वडील वारल्यानंतर जाणते पणाची जाणीव होऊ लागताच आईचे अंतर्मन ओळखून परशराम यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षक -प्राध्यापक बनणे हे त्यांचे ध्येय होते. त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करत असताना दुसरीकडे परशराम हे गवंडी कामासह फोटो स्टुडिओ व कारखान्यांमध्ये मिळेल ते काम करून घरच्या उदरनिर्वाहासह स्वतःच्या शिक्षणाची सोय करत होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण उचगाव येथील हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर कोवाड येथे बारावीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या परशराम कुंभार यांनी बेळगावच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयातून बीएची पदवी संपादन केली. पुढे धारवाडमधून त्यांनी एमएची पदवी देखील मिळविली. तिथे प्रा. बाबुराव गायकवाड यांनी त्यांच्या हॉस्टेलची सोय करण्याबरोबरच आर्थिक सहाय्य देखील केले.

बीएड केल्याशिवाय प्राध्यापक होता येत नाही, हे ज्यावेळी परशराम यांना कळाले त्यावेळी त्यांची घरची आर्थिक परिस्थिती आवश्यक शैक्षणिक शुल्क भरण्या इतकी सक्षम नव्हती. त्यावेळी कांही दानशूर व्यक्ती त्यांच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांच्या मदतीने परशराम यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. बीएडची पदवी संपादन करणाऱ्या परशराम कुंभार यांनी सुरुवातीला मजगाव मधील खाजगी हायस्कूलमध्ये 2 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी 2010 मध्ये बिदर जिल्ह्यातील उजळंब (ता. बसवकल्याण) येथील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. पुढे 2016 मध्ये त्यांची खानापूर तालुक्यातील निलावडे सरकारी हायस्कूलमध्ये बदली झाली. सध्या ते शहापूर मधील सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा आजतागायतचा प्रवास खडतर असला तरी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून मिळवलेले यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.