बेळगाव लाईव्ह : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेनंतर बेळगावमध्ये नवगोबा यात्रा पार पडते. यंदा हि यात्रा रविवार दि. १९ जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे अशी माहिती शहर देवस्थान समितीच्यावतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात दिली आहे.
शिवाजी नगर पेट्रोल पंप समोरील खुल्या जागेत श्री रेणुका देवी व सासन काठी (नवगोबा) यात्रा संपन्न होणार आहे. यावेळी सर्व भाविक, आजी माजी आमदार, नगरसेवक पंच मंडळीनी उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश यासह देशभरातील दरवर्षी लाखो भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. पूर्वी होणाऱ्या गर्दीत अनेक साथीचे रोग, व्याधी पसरायच्या.
पूर्वी म्हणावी तितकी साधने उपलब्ध नसल्याने रोगराई पसरण्याची भीती असायची. शिवाय दळणवळणाची सोयही नसल्याने बहुतांशी भाविक पायी किंवा बैलगाडीने जायचे. यात्राकाळात ८-१० दिवस मुक्काम ठोकणाऱ्या भाविकांमध्ये वातावरणासहित इतर कारणामुळे अनेक साथीचे आजार जडायचे. हेच आजार यात्रेहून परतल्यानंतर गावातील इतर नागरिकांमध्ये पसरू नयेत, संसर्ग वाढू नये यासाठी यात्रेहून परतलेले भाविक गावच्या सीमेवर थांबायचे. सीमेवर ३ ते ४ दिवस मुक्काम करायचे.
या काळात अनेक धार्मिक विधी पार पाडल्या जायच्या. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली हि प्रथा आजतागायत सुरु असून शहर देवस्थान समितीच्या वतीने तसेच भाविकांच्या वतीने या यात्रेचे योग्य व्यवस्थापन केले जायचे.
सौंदत्ती येथे पार पडणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त दाखल होणारे भाविक सौंदत्ती येथील पडली कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा गावच्या वेशीवर पडली कार्यक्रमाचे आयोजन करतात. ग्रामीण भागात या यात्रेला ‘मारग’ किंवा ‘मार्ग मळणे’ असे म्हणतात.
बेळगाव मध्ये मध्यवर्ती बस स्थानकानजीक असणाऱ्या जागेत नवगोबा यात्रा पार पडायची. मध्यवर्ती बस स्थानकानजीकच्या जागेत काही बदल झाल्याने सध्या हि यात्रा शिवाजी नगर येथील पेट्रोल पंप समोरील मोकळ्या जागेत सुरु असून येत्या रविवारी (१९ रोजी) हि यात्रा भरविण्यात येणार आहे.