बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेची सांगता बुधवारी मुंबईचे डॉ. मिलिंद सरदार यांच्या आरोग्य विषयक व्याख्यानाने झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी डॉ. मिलिंद सरदार यांचे “आनंदी आणि सदृढ जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान पार पडले.
यावेळी डॉ. मिलिंद सरदार यांनी सुदृढ आरोग्यासाठी आजच्या काळात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, आरोग्य जपण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे, पूर्वापार चालत आलेल्या प्रथांमागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत अशा विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात बहुसंख्य नागरिक आरोग्यासंबंधी तक्रारींशी झुंझत आहेत.
तणावपूर्ण आणि धावपळीचे जीवन जगताना आरोग्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. मात्र आरोग्य हीच आपली संपत्ती आहे याकडे दुर्लक्ष न करता योग्यपद्धतीने संतुलित पद्धतीने आरोग्याची जपणूक करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आजच्या काळात शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि अध्यात्मिक स्तरावर आपले संतुलन असेल तर आपण आरोग्यशाली आहोत, असे समजावे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून आरतीच्यावेळी टाळ्या का वाजविल्या जातात, यामागील शास्त्रीय कारण काय आहे आणि याचा आरोग्यावर कशापद्धतीने हितकारक परिणाम होतो याविषयी त्यांनी विश्लेषण केले. या व्याख्यानादरम्यान उपस्थितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. डॉ. मिलिंद सरदार यांनी केलेल्या मार्गदर्शनावर उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
गेल्या ५० वर्षांपासून सार्वजनिक वाचनालयाने व्याख्यानमालेची परंपरा जपली असून व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात इचलकरंजी येथील व्याख्याते मा. प्रथमेश इंदुलकर यांचे “संस्कार महापुरुषांचे” या विषयावर व्याख्यान पार पडले. दुसऱ्या पुष्पात संतसाहित्याचे अभ्यासक कृष्णाजी कुलकर्णी यांचे ‘संतविचार आणि समकाल’ या विषयावर व्याख्यान पार पडले. तिसऱ्या पुष्पात बेळगावचे ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी “माझा नाट्यप्रवास” या माध्यमातून आपला कलाक्षेत्रातील प्रवास उलगडला.
चौथ्या पुष्पात भुदरगडचे युवराज पाटील यांचे “जीवनात कसे तणावमुक्त राहता येईल” या विषयावर व्याख्यान पार पडले. तर पाचव्या पुष्पात डॉ. मिलिंद सरदार यांचे “आनंदी आणि सदृढ जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान पार पडले. संपूर्ण व्याख्यानमालेत रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रत्येक व्याख्यात्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.