बेळगाव लाईव्ह :बुडाने बळ्ळारी नाला काँक्रिटीकरण्याच्या प्रस्तावास दिलेली मंजुरी स्वागतार्ह आहे. कारण नाल्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या पुराच्या स्वरूपातील संकटाचे निवारण होणार आहे. तथापि हे संकट कायमचे निकालात काढण्यासाठी
बसवन कुडची रोड ते सुळेभावी पर्यंतच्या नाल्याचे रुंदीकरण होणे देखील अत्यावश्यक आहे, असे मत बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी व्यक्त केले.
बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण केले जाणार असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. बळ्ळारी नाल्याच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे नारायण सावंत म्हणाले की, बेळगाव शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची समस्या खूप गंभीर आहे. कारण या नाल्यांमध्ये संपूर्ण शहराचे सांडपाणी पावसाळ्यात पुराच्या स्वरूपात शेत पिकांमध्ये शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो.
त्या दोन्ही नाल्यांपैकी लेंडी नाला महापालिकेच्या अखत्यारित, तर बळ्ळारी नाला पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत येतो. गेल्या 2002 सालापासून या नाल्यांमुळे पुराची समस्या निर्माण होऊ लागल्यानंतर तिच्यावर निवारणासाठी आम्ही सातत्याने लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींसह महापालिका व पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करत होतो.
कारण त्यावेळी पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची उंची 3 फूट असल्यामुळे बळ्ळारी नाल्याचे पाणी ओव्हर फ्लो होऊन पलीकडे जात होते. मात्र कालांतराने महामार्गाचे चौपदरीकरण होऊन त्याची उंची वाढली जिने एखाद्या धरणाप्रमाणे बळ्ळारी व लेंडी नाल्याचे पाणी अडवण्यास सुरुवात केली. परिणामी पावसाळ्यात या नाल्यांचे पाणी बेळगाव शहराच्या सीमेपासून राष्ट्रीय महामार्ग पर्यंतच्या परिसरात असलेल्या शेतजमिनींमध्ये पुराच्या स्वरूपात पसरवू लागले. ही पुराची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) बळ्ळारी नाल्याच्या कॉंक्रिटीकरणाचा जो प्रस्ताव मंजूर केला आहे, त्याचे मी बेळगाव शेतकरी संघटनेतर्फे स्वागत करतो. नाल्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे पुराची समस्या निकालात निघेल अशी आम्हाला आशा आहे.
कारण गेल्या 2002 पासून दरवर्षी शेतकऱ्यांना सोसावा लागलेला त्रास भयानक आहे. पुरामुळे त्यांना पिकं घेता आली नाहीत आणि पेरलेली पिकं पुरात नष्ट झाली.
बळ्ळारी नाल्याचे कॉंक्रिटीकरण येळ्ळूर रोडपासून बसवन कुडचीच्या नाल्यापर्यंतच केले जाणार असे बोलले जात आहे. त्याबद्दल बोलताना बसवन कुडचीपासून सुळेभावी पर्यंतचा बळ्ळारी नाला खडकाळ भागातून जातो. त्यामुळे त्या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करायचे झाल्यास खडक फोडावा लागणार आहे. मी यापूर्वी दिलेल्या माझ्या निवेदनात तसे नमूद केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे बसवन कुडची रोड ते सुळेभावी पर्यंतच्या नाल्याचे रुंदीकरण होणे अगत्याचे आहे. त्या ठिकाणी नाला अरुंद असल्यामुळे आमच्या भागात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. या खेरीज सुळेभावी जवळ नाल्यावर घातलेले पाईप अडथळा ठरत आहेत. त्यामुळे तिकडचा नाला रुंद केल्याशिवाय इकडच्या बाजूला साचणाऱ्या पाण्याचा निचरा होणार नाही, असे त्यांनी पुढे सांगितले.
नाल्याचे कॉंक्रिटीकरण झाल्यास पुराचे संकट नाहीसे होऊन रोगराईला आळा बसू शकेल का? या संदर्भात बोलताना रोगराईला आळा घालण्यासाठी मी केलेले प्रयत्न वेगळे होते असे सावंत यांनी सांगितले. कारण तत्कालीन खासदार सुरेश अंगडी यांनी बळ्ळारी नाल्याच्या पाण्यावरच परिसरातील पीक-पाणी चालत असल्यामुळे हा नाला शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी लघुपाटबंधारे खात्यामार्फत मी सरकारकडू नाल्याच्या ठिकाणी सौर प्रणाली बसवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे नाल्याची समस्या ‘जैसे थे’ राहिली शहरातील शास्त्रीनगर येथून सुरू होणाऱ्या लेंडी नाल्याची समस्या निकालात काढण्यासाठी त्याचे संपूर्ण रुंदीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी नेते नारायण सावंत यांनी स्पष्ट केले.