बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील प्रसिद्ध मासाबी दर्ग्याच्या विकासासाठी चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून वक्फ मंडळाच्या माध्यमातून दर्ग्याच्या मूलभूत सुविधांचा विकास होणार आहे.
रायबाग तालुक्यातील कुडची येथील मासाबी दर्गा हा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे भाविक मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेतात. वर्षभर लाखो लोक येथे भेट देत असतात.
खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी विशेष प्रयत्न करून वक्फ मंडळाकडून दोन कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे. या निधीतून दर्ग्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळतील.
त्याचबरोबर, सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर हेही बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असून, येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. या मंदिरासाठी रेल्वे संपर्काची आवश्यकता असल्याचे नमूद करून प्रियांका जारकीहोळी यांनी संसदेत आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रियांका जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना दिल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.