बेळगाव लाईव्ह : खानापूर: खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तब्बल 24 वर्षांनंतर महालक्ष्मी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या निमित्ताने गावातील पंच मंडळी आणि यात्रा कमिटीने भाविकांसाठी विविध निर्णय घेतले असून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यात्रेची सुरुवात 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून, लक्ष्मी अक्षता रोखणाचा पारंपरिक कार्यक्रम यासाठी खास आकर्षण असेल.
यात्रा कमिटीने या वेळी एक आगळा निर्णय घेत “आहेर” देण्याची परंपरा पूर्णतः बंद करण्याचं आवाहन केलं आहे. भाविकांनी कोणताही आहेर न आणता फक्त महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं आणि अनावश्यक खर्च टाळावा, असा संदेश देण्यात आला आहे. यात्रेला साधेपणाने आणि भक्तिभावाने साजरं करण्याचा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं कमिटीने स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात बेळगावातील सकल मराठा समाजाने अशा पद्धतीच्या प्रथांना आळा घालण्याचे आवाहन केले होते. याा संदर्भात यात्रा कमिटीला लेखी स्वरूपात निवेदन देखील दिले होते यानुसार नंदगड यात्रा कमिटीने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेत एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने झेपावले आहे.
गावातील महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं ९० टक्के काम पूर्ण झालं असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. यात्रेसाठी मंदिर परिसरात मंडप उभारणीचं काम सुरू होणार आहे. या यात्रेत राम मंदिराचा देखावा मुख्य आकर्षण असेल. त्याचबरोबर रथाची 80% तयारी पूर्ण झाली आहे.
गावात गाड्यांची गर्दी होऊ नये म्हणून गावाबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी वाहन गावाबाहेर पार्क करूनच यात्रेत सहभागी व्हावं, असा सल्ला देण्यात आला आहे. यात्रेच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. कुस्तीप्रेमींसाठी नंदगड आणि खानापूर भागात कुस्ती स्पर्धांचं आयोजन होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक नाटकं, संगीत कार्यक्रम, आणि विविध भाषिक समाजांसाठी खास उपक्रम सादर होणार आहेत.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी खासदार, आमदार, आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली गेली आहे. नंदगड धरणातून 24 तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.
यात्रा कमिटीने घेतलेला “आहेर” बंदीचा निर्णय गावकऱ्यांच्या पाठिंब्याने घेतला गेला असून, ही यात्रा पारंपरिकतेसह आधुनिकतेचं प्रतीक ठरणार आहे. यात्रेच्या आयोजनाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाविकांनी महालक्ष्मीचं दर्शन घेऊन फक्त आशीर्वाद मिळवावा आणि यात्रेच्या साधेपणात सहभागी व्हावं, असं यात्रा कमिटीने केले आहे.