बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर शेतशिवारात शेतकऱ्यांचा विरोध डावलून हाय व्होल्टेज तारा घालण्याचे कामकाज सुरु करण्यात आले असून बायपास कामकाजामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. हलगा-मच्छे बायपास प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर गंभीर संकट कोसळले आहे. वडिलोपार्जित सुपीक जमिनींवर होणाऱ्या या कामांमुळे शेतकऱ्यांचा जीवनमान धोक्यात आले आहे.
बायपासच्या कामांमुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान आणि विरोध डावलून संपादित करण्यात येत असलेल्या जमिनी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आता बायपासच्या कामासाठी येळ्ळूर शिवारात हाय व्होल्टेज वीजवाहिन्या घालण्याचे कामकाज सुरु असून उभ्या पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
येळ्ळूर शिवारातील सुपीक जमिनी बायपाससाठी संपादित करण्यात आल्या असून, या जमिनीत वर्षभर तिबार पीक घेतले जाते. यामुळे या जमिनी शेतकऱ्यांसाठी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाचा आधार आहेत. अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. बायपाससाठी जमिनी संपादित करताना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक हाय व्होल्टेज तारा घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षीही या प्रकल्पामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. यंदाही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
याबाबत येथील महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडतांना सांगितले कि, आम्ही वडिलोपार्जित शेतीत पिढ्यानपिढ्या राबत आलो आहोत. पण बायपास प्रकल्पामुळे आमच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. आता आम्ही कसे जगायचे? अशी व्यथा शेतकरी महिलांनी मांडली.
प्रकल्पाचे कामकाज सुरू करताना शेतकऱ्यांच्या मतांचा विचार केला गेला नाही, सुपीक जमिनीतून प्रकल्प राबवून विकास करण्या ऐवजी सरकारने नापिक जमिनींचा विचार करून प्रकल्प राबवावा आणि सुपीक जमिनींचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. हलगा मच्छे बायपास मध्ये जी शेतजमीन संपादित करण्यात येत आहे त्या शेतजमिनीच्या माध्यमातून वर्षभरात विविध पिके घेतली जातात. येथील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. कित्येक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह याच शेतजमिनींमुळे होतो. मात्र बायपासच्या कामामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
एकीकडे शेतकरी बचाओ म्हणणाऱ्या सरकारने दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे असे म्हणणारे सरकार शेतकऱ्याचे लचके तोडत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.