बेळगाव लाईव्ह :शहापूर, बेळगाव येथील श्री सरस्वती वाचनालयातर्फे राज्य मराठी विकास संस्था अनुदान योजनेअंतर्गत वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येत्या मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भारत सरकारचे माजी प्रशासकीय अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक नवी दिल्लीचे डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये यांचे ‘लाईफ इज फन मेक इट क्रिएटिव्ह’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हा व्याख्यानाचा कार्यक्रम कोरे गल्ली शहापूर येथील श्री सरस्वती वाचनालयाच्या शकुंतला गिजरे सभागृहामध्ये होणार आहे. व्याख्यात्यांचा अल्प परिचय : 5 नोव्हेंबर 1958 रोजी जन्मलेले ज्ञानेश्वर मुळ्ये (ज्ञानेश्वर मुढे) हे एक भारतीय करिअर डिप्लोमॅट होते,
जे 35 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. भारताच्या राष्ट्रपतींनी एप्रिल 2019 मध्ये त्यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणून केली आणि एप्रिल 2024 पर्यंत त्यांनी तेथे काम केले.
1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झालेल्या ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी त्यानंतर अनेक उच्च पदांवर काम केले आहे. ज्यात भारतीय वाणिज्य दूत न्यूयॉर्क आणि भारताचे उच्चायुक्त माले, मालदीव या पदांचा समावेश आहे. ते एक यशस्वी लेखक असून त्यांनी 15 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. जी अरबी, धिवेही, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषेत अनुवादित झाली आहेत.
मराठीत लिहिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट रचना -माती, पंख आणि आकाश याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे आणि त्यांचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव (महाराष्ट्र) येथील कला अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे.
आपल्या मूळगावी बालोद्यान अनाथाश्रम आणि ग्लोबल एज्युकेशन सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणाऱ्या ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी एज्युकेशन सोसायटीसह अनेक सामाजिक शैक्षणिक प्रकल्प यांना प्रेरणा दिली आहे. तरी त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला रसिक श्रोतृवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. सौ. स्वरूपा इनामदार यांनी केले आहे.