बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला असून कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय दोन चे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्ली येथील विजय चौकात पाईप बँडचे सादरीकरण करणार आहे. देशभरातील विविध शाळातून झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या या शाळेची निवड झाली आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालय दोन वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली येथील विजय चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यात लष्करी कवायती आणि विविध राज्यांचे वैशिष्ट्य असलेल्या शोभायात्रा निघणार आहेत.
त्यातच पाईप ब्रँड साठी देशभरातील विविध शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत केंद्रीय विद्यालय दोन चा विद्यार्थ्यांनी पाईप ब्रँडमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे अंतिम चाचणी शुक्रवारी दिनांक 24 रोजी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर पार पडली. या चाचणीसाठी केंद्रीय पथक दाखल झाले होते. देशातील विविध भागातील एकूण 16 शाळातील विद्यार्थ्यांनी बँड सादरीकरण केले होते त्यात तीन शाळांची निवड झाली असून बेळगावसोबत सिक्कीम आणि झारखंडच्या दोन शाळा देखील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यांनी विजय चौकात सादरीकरण होणाऱ्या पाईप ब्रँड साठी बेळगावच्या केंद्रीय विद्यालय 2 ची निवड घोषित केली. बेळगावला हा मान मिळाला असल्यामुळे शहराचे नाव देश पातळीवर पोचले आहे.
कॅम्प येथील केंद्रीय विद्यालय आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाते. आता या शाळेच्या इतिहासात आणखी एक अध्याय लिहिला जाणार आहे. संपूर्ण देशासमोर या शाळेचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी पाईप ब्रँडचे सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण बेळगावकरांसाठी हा अभिमानाचा क्षण बनला आहे.